ताज्यातवान्या चेरीचे ढीग एका पिवळ्या ताडपत्रीवर रचले आहेत. वयाच्या साठीत असलेले अब्दुल सलाम खान आणि नसरुल्ला खान हे दोघे भाऊ त्या ताडपत्रीवर मांडी घालून एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. ते अगदी सहजपणे फळांची प्रतवारी आणि वर्गीकरण करत आहेत. सूर्यप्रकाश त्या कापडावर चमकतोय, हा कष्टप्रद हंगाम संपत असताना त्यांचे थकलेले चेहरे त्या प्रकाशात उजळून निघताहेत.
त्यांची फळबाग खूपच लहान आहे, जेमतेम पाव एकराची. मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील सोराफ रॉ गावात ही फळबाग आहे.
जूनच्या एका सोनसळी सकाळी ६५ वर्षीय अब्दुल सलाम म्हणतात, “हे वर्ष खूप कठीण चाललंय, आम्ही ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून हा व्यवसाय करतोय, पण मी असा हंगाम कधीही पाहिला नव्हता. हवामान आणि पर्यटकांची कमतरता या दोन्हीचा आम्हाला मोठा फटका बसलाय.”
पश्तून समुदायाशी नाळ जोडलेल्या खान बंधूंनी या वर्षाच्या सुरुवातीला सोराफ रॉमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या चेरीच्या दोन एकर बागा भाडेतत्त्वावर घेतल्या. हे गाव श्रीनगरच्या उत्तरेस ४९ किलोमीटर अंतरावर आहे, जे त्यांच्या गोटली बागमधील घरापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
कुटुंबातली मंडळी आणि कामावर ठेवलेले मजूर यांनी मिळून तोडणीचं काम केलं, पण महिनो न् महिन्यांच्या मेहनतीनंतरही ग्राहक मात्र दुर्मिळ होते.














