“दिदी, आपण खरंच आपल्या स्वतःच्या भाषेतली पुस्तकं इथे वाचू शकतो का?” १५ वर्षांचा अंश उराव मला विचारतो, हातात कुरुख भाषेचं पुस्तक धरून.
आपण पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शाळेत आहोत. अंशचे आईवडील, आणि माझेही, ज्या चहाबागेत काम करतात ती लीश नदीच्या काठी आहे.
इथल्या बहुतेक कामगार कुटुंबांप्रमाणेच आम्हीही मूळचे उराव आदिवासी समाजातले आहोत. आमचे पूर्वज चार पिढ्यांपूर्वी छोटानागपूर पठारातील रांची, गुमला आणि सिमडेगा (म्हणजे आताचं झारखंड) या जिल्ह्यांतून इथं आले. घरी आम्ही आजही आमच्या मातृभाषेत म्हणजेच कुरुख भाषेतच बोलतो, पण बाहेर मात्र हिंदी व बांगला. म्हणूनच अंशने कधीही कुरुखमधील पुस्तक प्रत्यक्षात पाहिलंच नव्हतं.
मी लीश नदीच्या चहाबागेतल्या पटीबारी इथेच वाढले. जनगणनेच्या हँडबुकमध्ये याचं स्पेलिंग ‘लिशरिवर’ असं आहे, पण गावकरी आणि स्थानिक प्रशासन ‘लीश रिवर’ असंच लिहितात.



















