गावातल्या पोस्ट ऑफिसचे दरवाजे किरकिर करत उघडतात आणि आम्हाला तिथे येताना पाहून तिथले पोस्टमन स्वतःच खिडकीतून डोकावून पाहतात.
रेणुका प्रसाद अगदी हसून आमचं पोस्टात स्वागत करतात. घरातल्या एका खोलीचं हे पोस्ट ऑफिस. दिवाणखान्यातल्या एका दरवाज्यातून आम्ही आत जातो. या छोट्याशा खोलीत आत शिरल्या शिरल्या कागद आणि शाईचा वास नाकात भरून जातो. रेणुका प्रसाद त्या दिवशीचं शेवटचं टपाल गठ्ठ्यात ठेवत होते. हसतच ते मला बसायची खूण करतात. “ये, ये. अगदी निवांत बस.”
बाहेरचा गरमा इथे त्यांच्या घरात आणि पोस्टात जाणवत नाही. एका खिडकीतून अधून मधून वारा आत येतो. चुनासफेदी केलेल्या भिंतींवर हाताने तयार केलेली काही पोस्टर, नकाशे आणि अनेक याद्या टांगलेल्या दिसतात. खोली छोटीच, पण नीटनेटकी. आणि इतकी महत्त्वाची जागा तशीच असायला पण हवी ना. एक बाक आणि टपाल ठेवण्याचं फडताळ यातच खोलीतली बरीचशी जागा व्यापून गेलीये. तरीही तिथे गर्दी वाटत नाही.
चौसष्ट वर्षीय रेणुकाप्पा तुमकुर जिल्ह्याच्या देवरायपटणामध्ये ग्रामीण डाक सेवक आहेत. तिथली सहा गावं त्यांच्या अखत्यारीत येतात.
देवरायपटणामधल्या या पोस्टाची अधिकृत वेळ सकाळी ८.३० ते १ अशी असली तरी रेणुकाप्पा मात्र अनेकदा सकाळी ७ वाजताच काम सुरू करतात ते पार ५ वाजेपर्यंत. ते एकटेच इथे कामाला आहेत. “इतकं सगळं काम साडेचार तासात पूर्णच होऊ शकत नाही,” ते सांगतात.








