माया थामी पाठीवर ३० किलो वजनाचा गॅस सिलिंडर घेऊन तीन किलोमीटर चालत आली होती. हे वजन उचलून तिनं जवळपास २०० पायऱ्या चढल्या अन् दिवसातल्या पहिल्या गिऱ्हाईकापर्यंत सिलेंडर पोहोचवलं.
ही ३२ वर्षांची तरुणी श्वास रोखून बोलत होती, आता मला त्या टेकडीवर आणखी एक सिलेंडर पोहोचवायचाय. दूरवर एका चढाकडे बोट दाखवत ती बोलत होती. या सिलेंडर डिलिव्हरीसाठी तिला ८० रुपये मिळाले. गिऱ्हाईकाकडून पैसे घेऊन ती लगोलग पुढच्या डिलिव्हरीसाठी कामाला लागली. आता पुढचे सहा तास ती पाठीवर सिलेंडर घेऊन चालत राहील अन् टेकडीवरच्या त्या घरी सिलेंडर पोहोचवेल.
जेव्हा वजन जास्त असतं तेव्हा सामान वाहून नेण्यासाठी पुरुषांना प्राधान्य दिलं जातं, आम्ही महिला हमाल असल्यामुळं बऱ्याचदा लोक भाव कमी करतात, माया सांगते. जिथे एका खेपेसाठी एका महिलेला ८० रुपये मजूरी मिळते तिथे पुरुषाला १०० मिळतात. सारख्याच अंतराच्या कामासाठी त्यांना २० रुपये कमी मिळतात.
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील महत्त्वाचं शहर. समुद्रसपाटीपासून साधारण २०४२ मीटर उंचीवर वसलेलं. डोंगराळ भाग आणि वळणावळणाचे रस्ते यामुळं इथं वाहतुकीला बऱ्याचदा अडथळा येतो. इथल्या स्थानिकांना भाजीपाला, पाणी, स्वयंपाकासाठीचा गॅस सिलिंडर यासारख्या दैनंदिन वस्तूंसाठी हमालांवर अवलंबून राहावं लागतं. वाहनांना या वळणावळणाच्या रस्त्यांवरून घरांपर्यंत सामान पोहोचवणं शक्य नसतं. दैनंदिन वस्तू घरांपर्यंत नेण्यासाठी एकमेव पर्याय असतो तो म्हणजे स्वतः सामान उचलून न्यायचं किंवा हमालांना मजूरी देऊन वाहून न्यायचं.











