“एका रातीत ढगफुटी झाली आणि समदंच वाहून गेलं... बघा बघा. सगळंच वाहून गेलं. घर गेलं. जनावरं गेली चार. समदंच वाहून गेलं,” श्रीकवल भारत मोरे मावशी सांगू लागल्या. “कंबरेपर्यंत पाणी होतं. आमच्या पोरानं आमाला उठविलं म्हणून आम्ही वाचलो. पाणीच असलं होतं.”
मोरे मावशींच्या घरात उरलीसुरली भांडी लोखंडी रॅकवर ठेवली होती. घराची जमीन नावाला उरलेली नाही. खड्डे पडून खालची माती वाहून गेली होती.
२१ सप्टेंबरच्या रात्रीची गोष्ट. धाराशिव जिल्ह्याच्या (पूर्वीचा उस्मानाबाद) भूम तालुक्यातलं चिंचपूर ढगे हे २४०५ लोकसंख्येचं गाव. बाणगंगा नदीच्या काठी वसलेल्या चिंचपूर ढगे गावात २१ आणि २२ सप्टेंबर दोन्ही दिवस रात्रभर मुसळधार पाऊस झाला. बाणगंगा नदीला पूर आला आणि ‘आयुष्यभरात पाहिलं नाही’ असं पाणी गावात शिरलं.
तिशी पार केलेले सूर्यकांत चंद्रकांत मोरे नदीपात्र दाखवतात आणि म्हणतात, “बाणगंगा नदीकाठची सगळी शेतं वाहून गेलीयेत. एक एकराच्या दोन द्राक्ष बागा पूर्णपणे वाहून गेल्या. जनावरं थोडक्यात वाचली. त्यांच्याही नरड्यापर्यंत पाणी आलं होतं. पण तेवढ्यात सोडली म्हणून कशी बशी वाचली,” मोरे सांगतात. “पण शेतातल्या शेडमध्ये काढून ठेवलेलं धान्य, शेंगा, जवारी, मूग, उडीद सगळं भिजलं. कडबा वाहून गेला.”
मोरेंचं कांद्याचं रान पूर्ण खरवडून गेलं. एकर-दीड एकर. रान खरवडून गेलं म्हणजे तिथे आता मातीच राहिलेली नाही. फक्त दगड, मुरुम दिसतोय. वरचा सुपीक मातीचा थरच निघून गेलाय.























