हे वृत्तांकन पार्थ एम. एन. यांच्या पुलित्झर सेंटरच्या पाठिंबा असलेल्या मालिकेचा भाग आहे.
गंभीर मानसिक समस्या असलेल्या आपल्या मुलीवर उपचार करण्यासाठी ७५ वर्षीय आस्मा खान १०० किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं गाव सोडून इथं आल्या. त्यांना इथं येऊन आता १२ वर्षांचा काळ लोटलाय, परंतु आई आणि मुलगी दोघीही अद्याप घरी परत गेल्या नाहीत.
छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातल्या एका गावात कामगार कुटुंबात जन्मलेल्या फातिमाचं तरुणपण त्रासदायक होतं. तिला वारंवार चक्कर यायची, ज्यानं ती अनेकदा बेशुद्धही पडायची. हे प्रमाण हळूहळू वाढत गेलं आणि तिचा आक्रमकपणा वाढत गेला.
“अनेक वर्षं आम्ही तिला एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यात घालवली,” असं आस्मा सांगतात. “तिच्यावर उपचार करण्यासाठी आमची जनावरं विकावी लागली. पण काहीच फायदा झाला नाही. तिचा त्रास वाढतच होता. ती तिचं भान हरपत असल्याचंही आम्हाला जाणवत होतं.”
एक दिवस असा उगवला की, फातिमा कुणालाच ओळखत नव्हती आणि ती खोल नैराश्यात गेली. वयाच्या तिशीत असलेल्या फातिमाच्या आईवडिलांसमोर तसा अंधारच होता. तिच्या ढासळत्या मानसिक आरोग्यामुळं ते दोघंही पुरते खचून गेले, दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न त्यांच्यापुढ्यात उभा राहिला होता.
“ती तिचे कपडे फाडायची आणि तिला आवरताना काय करावं हे आम्हाला सूचत नव्हतं,” आस्माला जुने दिवस आठवतात. तेव्हा आमच्या एका शेजाऱ्यानं सल्ला दिला.
त्यांच्या गावापासून १०० किलोमीटर अंतरावर एक दर्गा आहे, जो सुमारे ११७ वर्षे जुना आहे. एका आख्यायिकेप्रमाणं, हजरत हाजी अब्दुर रहमान उर्फ सैलानी शाह बाबा हे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पिंपळेगाव सराई इथं आले. हे गाव विदर्भातल्या बुलढाणा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. सैलानी बाबांकडं भूतबाधा झालेल्यांना मुक्त करण्याची शक्ती होती असं म्हटलं जातं. १९०८ मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीत इथं हा दर्गा बांधण्यात आला.
साधारण तेव्हापासून, दरवर्षी मार्चमध्ये वार्षिक उर्स भरतो आणि लाखो भाविक इथं हजेरी लावतात.










