गोपालनगरमधल्या एका लहानश्या संथाल घराच्या मातीच्या भिंतींवर एक छोटसं जंगल वाढतंय. छतावरून उगवलेली ही झाडे त्याच्या शेजारीच उगवलेल्या कडुलिंबाच्या झाडाच्या फांद्यांमध्ये मिसळतायत. ज्या मार्गावर ठिपक्यांचे हरीण दिसतं, तो मार्ग लहान फुलांनी आणि मोठ्या फुलपाखरांनी भरलेला दिसतोय. बुलबुल, सातभाई, तांबट, लांब शेपटीचे पोपट या पक्ष्यांचे पंख चमकदार रंगांनी भरलेत. जवळच्याच इलामबाजार जंगलातले हे पक्षी प्राणी भिंतीवरच्या हलक्या रंगावर उठून दिसतात.
७५ वर्षांच्या चुर्की टुडू यांना भिंतीवरच्या या प्राण्यांची हालचाल किंवा त्याचं अस्तित्व जाणवत नाही की मे महिन्यातल्या दुपारी तिच्या पत्र्याच्या छतावर होणाऱ्या अवकाळी पावसाचा आवाजही ऐकू येत नाही. पण घराबाहेरच्या भिंतीवरील या चित्राजवळून चालताना आमच्या पावलांचा आवाज कानावर पडतो, जो मातीतल्या कांथ्यासारखा येत होता.
इलामबाजार ब्लॉकमधल्या या गावातून जाणारा एक खड्ड्याचा रस्ता दोन्ही बाजूंना अशा अनेक घट्ट विणलेल्या संथाल मातीच्या झोपड्यांनी भरलेला आहे. घराबाहेरच्या भिंतींवरील रंगीबेरंगी भित्तीचित्रं आपण जाताना आपले लक्ष वेधून घेतात.
“आजकालची पोरं फोन आणि वर्तमानपत्रांमधून नवीन डिझाइन बनवतात. आमच्या काळात इतकी विविधता कुठे होती? आम्ही फक्त शेतातून थोडी माती आणायचो आणि भिंतींवर रंग उडवायचो,” चुर्की टुडू त्यांच्या खोलीतून बाहेर येत त्यांच्या घराच्या दाराजवळ येताना बोलत होत्या. त्यांच्या आवाजातली सहजता सांगत होती की त्यांना त्यांच्या घराच्या सजवलेल्या भिंतींचे फोटो काढण्यासाठी गावात येणाऱ्या पाहुण्यांची आता सवय झाली आहे.
त्यांनी आमच्या बोलण्याची वाट पाहिली नाही, तर थेट त्यांच्या आवडीच्या विषयावर बोलायला सुरुवात केली. “पांढरा चिखल, लाल चिखल, काळा चिखल (रंग), हाडीर तेल (स्वयंपाकाच्या भांड्यातून काढलेले जळलेले तेल) पासून बनवलेले हे रंग होते.” क्षणभर थांबून त्या पुढे म्हणाल्या, “अगोदर भिंतीवरून जुना मातीचा थर काढून टाकला जायचा. नंतर ती भिंत मातीनं सारवली जायली आणि मग आम्ही दुसऱ्या थरानं सारवायचो. सगळ्यात शेवटी, आम्ही खारीमती (चुनखडी किंवा खडू) ने कडा रंगवायचो.”
चुर्कीना पूर्वा वर्धमानच्या अकुलिया गावातल्या म्हणजे त्यांच्या जन्मगावच्या बालपणीच्या दिवस आठवतात. पण त्याचबरोबर त्यांना संथाल समुदायाच्या वेगाने बदलणाऱ्या पद्धती आणि नवीन पिढी या बदलांशी कशी जुळवून घेतेय याचीही माहिती आहे. त्या सध्या त्यांच्या मुलीसोबत गोपालनगरमध्ये राहताय. त्यांचं घर बोलपूरहून इलामबाजार जंगलाकडे जाणाऱ्या श्रीनिकेतन रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या या गावात आहे. या गावात जवळपास ३०४ घरं आहेत.


















