गेल्या दोन आठवड्यांपासून बालो मांझी आणि इतर नऊ बांधकाम कामगार एका वेगळ्याच कामात अडकले होते. पुरेसा गॅस नसल्याने स्वयंपाकासाठी त्यांना जवळच्या जंगलातून सरपण आणावं लागत होतं.
“दर दोन -तीन दिवसांनी, आम्ही पहाटे पाच वाजताच निघायचो. आणि दुपारपर्यंत, प्रत्येक जण १०-१२ किलो सरपण घेऊन परत यायचा,” ५५ वर्षीय बालो सांगतात. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अर्पा पंचायतीमध्ये आपल्या घराजवळ खाटेवर ते बसले होते.
“गोळा केलेलं सरपणात आम्ही १० लोकांसाठी तीन ते चार दिवस स्वयंपाक करायचो,” बालो सांगतात, “पण, आम्ही फक्त भात आणि डाळ किंवा भाजीच बनवायचो. कारण तीन पदार्थ बनवायचे म्हणजे जास्त लाकूड जाळावं लागलं असतं.”
चेन्नईच्या तांबरमइथल्या एका बांधकाम साइटवर ते काम करायचे. गॅट टंचाई नंतरची परिस्थिती कशी हाताळली याबद्दल ते सांगत होते.
सध्या सुरू असलेल्या एलपीजी संकटावर बालो आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांनी शोधून काढलेला हा तात्पुरता उपाय केवळ दोन आठवडे टिकला. “सरपण गोळा करणं नेहमीच शक्य असतं असं नाही,” ते म्हणतात.








