“अरे बघा याला! हा मेलाय…पण चालतोय अजूनही!”
गेल्या काही दिवसांत अमित मरांडी अख्ख्या गावात एक विनोदाचा विषय झालाय आणि परिस्थिती आजही काही फारशी वेगळी नाही. तो बांबूच्या मचाणाकडे निघालाय. अर्धा डझन गावकरी त्याची खिल्ली उडवत मजा घेतायत.
३२ वर्षांचा हा संथाल आदिवासीही त्यांच्याबरोबर थोडं कसनुसं हसतो, पण लगेचच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. त्याच्या डोळ्यांत उतरलेली खोल वेदना आपल्याला लगेचच दिसते “बघा ना, मी धडधडीत जिवंत असताना पण मला मृत ठरवलंय!” तो सांगतो.
अमित हा बिहारमधल्या लोहसिंग्ना गावचा मजूर. तो मतदार यादीबद्दल बोलतोय ज्यात त्याचं नाव ‘मृत’ म्हणून नोंदवलं गेलं आहे. मतदार यादीतली ‘अयोग्य’ नावं वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यात चालवलेली ही ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ मोहीम होती. पण लोआ टोलामध्ये मात्र नेमकं उलट घडलं. अनेक जिवंत आदिवासी मतदारांना या यादीत मृत ठरवलं गेलं. मी फोनवर स्थानिक संपर्क टीमला सांगितलं होतं की अमितचं नाव वगळलेल्या मतदारांच्या यादीत आहे.
तो निराशेने आणि कुत्सितपणे हसून म्हणतो, “वाईट तर वाटणारच ना… आपलंच नाव आपणच मृतांमध्ये वाचणं म्हणजे काय चेष्टा आहे का?”
दुपारचे साधारण बारा वाजले आहेत. मी लोआ टोलात म्हणजे एका आदिवासी वस्तीमध्ये आहे. माझ्या हातात बूथ क्रमांक २२३ मधील ‘वगळलेल्या मतदारांची यादी’ आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सहज तपास करताना मला ही यादी सापडली आणि त्याच वेळी लक्षात आलं, लोहसिंगणा गावच्या या बूथवरून माझ्यासारख्याच अनेक आदिवासींची नावं गायब झाली आहेत.
लोआ टोला हा संथाल आदिवासींचा एक छोटा पाडा आहे आणि त्यांचं हे नाव एका झाडावरून पडलंय. ‘डुमर’ किंवा ‘गुलर’ (अंजीराच्या प्रजातीतलं एक झाड) या झाडाला संथाल भाषेत ‘लोआ’ म्हणतात. हीच ती ऑस्ट्रोएशियाटिक परिवारातली एक भाषा जी आज देशातील सुमारे ७४ लाख लोक बोलतात.
स्थानिक लोकं सांगतात की कधी काळी त्यांच्या वस्तीत एक प्रचंड मोठं अंजीराचं झाड होतं आणि मग त्याच झाडावरून या वस्तीची ओळख निर्माण झाली. बहुतेक संथाल आदिवासींची घरं ही मातीची आणि गवताच्या छपरांनी आच्छादून बनलेली असतात. ‘बिहार जाती जनगणना (२०२२-२३)’ नुसार या समाजाचं सरासरी मासिक उत्पन्न फक्त सहा हजार रुपये किंवा त्याहूनही कमी आहे. सर्वसाधारणपणे दर पाचपैकी एक संथाल शेतकरी भाडेतत्वावर शेती घेऊन किंवा मग एक लहान शेतकरी म्हणून काम करतो. आणि बाकीचे, अमितसारखे, मजुरी करून पोट भरतात. अमित पाटण्याला गाडीचालक (ड्राइव्हर) म्हणून काम करतो.





















