“मी इथे काय करतोय? कसंय, माझं घर इथे जवळच आहे,” सुखराम कुमटी म्हणतो. आणि बोलता बोलता अंदाजे २०० मीटरवरच्या आपल्या घराच्या दिशेने हात करतो. आपण साठीचे आहोत असं वाटत असलेला सुखराम खापर पणजोबा आहे. रस्त्याच्या कडेला झाडाच्या जराशा सावलीत तो एका दगडावर बसला होता. आणि खरं तर त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या समोर मांडलेल्या वस्तूंमुळेच आमची उत्सुकता चाळवली होती.
वीस लिटरचा एक कॅन आणि त्यामध्ये पांढुरक्या रंगाचं काही तरी पाणी होतं. त्या कॅनच्या शेजारी प्लास्टिकचा एक रंगाचा डबा होता. जुना. त्या डब्यात दहा एक वर्षांपूर्वी रंग भरलेला असेल. आता मात्र त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं. पाण्यात एक दोन रंगीबेरंगी मग पोहत होते. एक लाल रंगाचा ग्लास आणि दोन वेगवेगळ्या रंगाचे मग ठेवले होते. कदाचित गिऱ्हाइकासाठी या रंगांचे दोन वेगवेगळे अर्थ असावेत. एका पिवळट कॅनच्या वरती विटलेल्या गुलाबी रंगाचा एक मग आणि गडद हिरव्या रंगाच्या डब्यावर मोरपंखी रंगाचा प्लास्टिकचा मग.
आम्ही होतो कोडोलीत. छत्तीसगडच्या बस्तरमधल्या अबुझमाड प्रांतात शिरल्यावर लागणारं हे दुसरं गाव. नारायणपूर हे जिल्हा मुख्यालय. तिथून गाडीने यायला लागल्यावर कोडोली लागतं.
सुखाराम काय करतोय ते आम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. जरासं वैतागूनच. कारण आमच्यापैकी मीच असा होतो की ज्याला तो काय म्हणतोय ते काहीही कळत नव्हतं.
“सल्फी, सल्फी...” माझ्याकडे अगदीच वाईट कटाक्ष टाकून तो म्हणतो. डोळे वटारून. माझं लक्ष आम्हा दोघांच्या गळ्यातल्या कॅमेऱ्यांकडे जातं. पण तो काही आम्हाला सेल्फी घ्यायला सांगत नव्हता.





