फलोत्पादन शास्त्रज्ञ शंकरन म्हणतात की आंब्याला मोहोर येण्यासाठी आदर्श तापमान २५-३० अंश सेल्सिअस असतं. “फेब्रुवारी २०२३ मध्ये दिवसा आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय तफावत होती. झाडं हे हाताळू शकत नाहीत,” ते पुढे म्हणतात.
गेल्या काही वर्षांमध्ये आंबा लागवडीसाठी परिस्थिती प्रतिकूल होत गेल्यामुळे, श्रीराममूर्ती यांना २०१४ मध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल पश्चाताप होऊ लागलाय. त्या वर्षी त्यांनी अनकापल्ली शहराजवळ ०.९ एकर जमीन विकली आणि मिळालेल्या रु. ६ लाखांमध्ये पोमुला भीमावरम येथील आंब्याच्या बागेसाठी पेट्टुबाडी (गुंतवणूक) म्हणून वापरली.
या निर्णयाबद्दल ते म्हणतात, “ते [आंबे] सगळ्यांना आवडतात आणि त्यांना मागणी असते. मला आशा होती की आंब्याच्या शेतीमुळे मला पुरेसे पैसे मिळतील."
मात्र तेव्हापासून त्यांना नफा मिळाला नाही. “२०१४ ते २०२२ दरम्यान, आंबा शेतीतून [या आठ वर्षांत] माझं एकूण उत्पन्न सहा लाखांपेक्षा [रुपये] जास्त नव्हतं,” श्रीराममूर्ती सांगतात. आपली जमीन विकण्याच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त करत ते म्हणतात, “मी विकलेली जमीन आता खूप मोलाची आहे. मी बहुधा आंब्याची शेती सुरू करायला नको होती.”
याला फक्त हवामानच कारणीभूत नाही. आंब्याची झाडं सागु नीरू (सिंचना) वर अवलंबून असतात आणि नागराजू किंवा श्रीराममूर्ती यापैकी एकाच्याही जमिनीवर बोअरवेल नाही. २०१८ मध्ये श्रीराममूर्ती यांनी बोअरवेल खोदण्यासाठी २.५ लाख रुपये खर्च केले पण त्यातून एक थेंबही पाणी निघालं नाही. नागराजू आणि श्रीराममूर्ती यांच्या बागा असलेल्या बुचियापेटा (बुचय्यापेटा) मंडळात अधिकृतपणे ३५ बोअरवेल आणि ३० खुल्या विहिरी आहेत.
श्रीराममूर्ती म्हणतात की वाळणाऱ्या मोहोराचा प्रश्न झाडांना सतत पाणी पुरवठा करून सोडवला जाऊ शकतो. ते आठवड्यातून दोन टँकर भरून पाणी विकत घेतात ज्यासाठी ते महिन्याला रु. १०,००० खर्च करतात. “प्रत्येक झाडाला रोज किमान एक लिटर पाणी लागतं. पण मी त्यांना आठवड्यातून दोनदाच पाणी देतो; मला एवढंच परवडतं,” श्रीराममूर्ती म्हणतात.
आपल्या आंब्याच्या झाडांना पाणी घालण्यासाठी नागराजू आठवड्यातून प्रत्येकी रु. ८,००० किमतीचे दोन टँकर विकत घेतात.