आपत्तीच्या काळात मदत म्हणून वाटलं गेलेलं साहित्य वापरून बनवलेला एक कप चहा माच्छीवाला गावातल्या लोकांनी या रिपोर्टरला दिला. रावी नदीला आलेल्या महापुरात त्यांची घरं वाहून गेली, शेतं गाळाने आणि पाण्याने भरली. आणि मग तंबूंमध्ये राहायची पाळी त्यांच्यावर आली.
ऑगस्टच्या पुरात त्यांनी जवळपास सर्वस्व गमावलं.
रमदास तालुक्यातल्या माच्छीवाला गावाबाहेर एका चुग्गीत (तंबू) सरबजीत कौर बसलीय. आधी तिचं घर होतं इथे. रावीच्या पुराने ते धुवून नेलंय. या पुराने तिचं आयुष्य पार उलटंपालटं करून टाकलंय; पण त्याविषयी बोलतानाही ती स्वत:च्या चेहऱ्यावरचं स्मित मावळू देत नाही.
“रात्रभर आम्ही बंध (बंधारा) वाचवायच्या प्रयत्नात होतो,” १८ वर्षीय सरबजीत सांगते. “२७ ऑगस्ट [२०२५] ला सकाळी ६ वाजता गुरुद्वारात लाऊडस्पीकरवर घोषणा झाली - तुस्सी [मातीचा बांध] तुटलाय. ही घोषणा गावभर ऐकू गेली. आम्ही सगळे जण मग लगेचच आसऱ्यासाठी उंचावरच्या ठिकाणांकडे धावलो.”
अमृतसर जिल्ह्यातलं माच्छीवाला हे एक लहानसं गाव. २०११ च्या जनगणनेनुसार इथे जवळपास १,१८६ लोक राहतात. यातले बहुतेक जण जाट शीख आणि राय शीख समुदायाचे! राय शीख समुदाय पंजाबमध्ये अनुसूचित जात म्हणून सूचीबद्ध आहे. आपल्या जमिनीच्या लहानशा तुकड्यावरची शेती आणि इतरांच्या शेतात मजुरी यावर इथल्या दलित कुटुंबांची गुजराण चालते.
सरबजितची आईही शेतमजूर म्हणून राबायची. सहा महिन्यांपूर्वी तिचं निधन झालं. सरबजितच्या वडिलांना अपस्मार आहे. ते काम करू शकत नाहीत. दोन भाऊ नि एक बहीण असं हे कुटुंब आपलं घर चालवण्यासाठी पूर्णपणे मजुरीवरच अवलंबून आहे.
अख्खं गाव पुरामुळे तीन-चार दिवस पाण्याखाली होतं. पाण्याने आठ फुटांपर्यंत मजल मारली. शेतमजुरांची लहान लहान घरं पाण्याच्या तडाख्यात कोसळली. हाताशी येऊ घातलेलं खरीपातलं भातपीक पार जमीनदोस्त झालं. शेतं गाळाने भरून गेली. मोठमोठी निलगिरीची झाडंही उन्मळून पडली.
















