विंध्य पर्वतरांगांमागे सूर्य मावळलेला असतो आणि पक्षी जंगलात परतलेले असतात. हीच वेळ दामा सस्तियाच्या प्रवासाची. सुगत गावातील आपल्या घरातून हा शेतकरी दगडधोंड्यांच्या वाटेने सुमारे एक किलोमीटर चालत एका झऱ्यापर्यंत जातो. तो संपूर्ण रात्र हंडे भरण्यात तिथेच घालवतो आणि सकाळी घरी परततो. “रात्री झऱ्यातून जास्त पाणी येतं,” असं पन्नास वर्षांचे दामा सांगतात.
२०११ च्या जनगणनेनुसार ५३४ लोकसंख्या असलेल्या संपूर्ण गावाची पाण्याची गरज केवळ एक-दोन झऱ्यांच्या पाण्यावर भागू शकत नाही. पहाटेपासून सुगत गावातील रहिवासी आपल्या पाण्याच्या कॅन आणि गाढवांसह अंघोळीसाठी आणि पाणी भरायला डोंगर उतरत नर्मदेपर्यंत जातात. हेच काम संध्याकाळी पुन्हा होतं. अंघोळ, भांडी धुणे आणिघरगुती वापरासाठी पाणी आणणे अशा कामांसाठी गावकरी रोज सरासरी तीन तास खर्च करतात. पाण्याचा हक्क हा जीवनाच्या मूलभूत हक्काचा भाग असल्याचं भारतीय संविधानाने मान्य केलेलं असतानासुद्धा, ही परिस्थिती मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन ठरते.
नदीपासून सर्वात दूरचं घर साधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे. पाणी आणण्यासाठी डोंगर उतरणं-चढणं मिळून रहिवाशांना तासाभराहून अधिक वेळ लागतो. पाण्यानं भरलेले हंडे घेऊन चढण चढायला उतरण्याच्या दुप्पट वेळ लागतो, त्यामुळे आठवड्याभरात चालण्याचा हा वेळ सुमारे १५ तासांचा होतो.
पहाटे ही जबाबदारी दामाचा मुलगा घेतो. आठ जणांच्या कुटुंबासाठी अत्यंत मौल्यवान असणाऱ्या पाण्याच्या कॅन भरण्यासाठी तो दोन गाढवांना घेऊन येतो. या कामाची सवय लागल्याने गाढव आता स्वतःहूनच घराकडे निघतात.
पंधरा वर्षांपूर्वी सुगत आणि शेजारच्या झांडणा गावातील भीलाला आदिवासी रहिवाशांसाठी पाणी ही समस्या नव्हती. नर्मदा आणि तिची उपनदी असलेल्या हातणी नदीच्या काठावर राहणाऱ्या या लोकांसाठी पाणी मुबलक आणि सहज उपलब्ध होतं.
नर्मदेवर उभारलेल्या सरदार सरोवर धरणामुळे ही गावं पाण्याखाली गेली आणि सगळं चित्रच बदलून गेलं. सुमारे २०१४ च्या आसपास धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आणि मध्य प्रदेशातील सुगत व झांडणा यांसह सुमारे २०० गावं जलमय झाली. नदीने रहिवाशांची शेतजमीन हिरावून घेतली. जे लोक स्थलांतरित झाले नाहीत किंवा ज्यांचं पुनर्वसन झालं नाही — उदाहरणार्थ दामा आणि त्याच्या कुटुंबासारखे अनेक — त्यांना विंध्य पर्वतरांगांमधील वरच्या भागात जावं लागलं, जिथे पाणी नाही, वीज नाही आणि नीट रस्तेही नाहीत.




























