ए बेरा बेटी इयं तांय, मार्ची बारी ते, बेरा बेटी इयं तांय
धांय से ददा जो डेनाम रे, बिहा गोटे नी
मन मजूर डेना ला रे, बिहा गोटे नी,
मार्ची बारी ते, बेरा बेटी इयं तांय
धांय से ददा जो डेनाम रे, बिहा गोटे नी
[मिर्चीच्या रानामध्ये लेक माझी रडे
बाबा, जाऊन बोलणी कर, लगीन लावून दे
आम्ही दोघं राजी आहोत, लगीन लावून दे
मिर्चीच्या रानामध्ये लेक माझी रडे
बाबा, जाऊन बोलणी कर, लगीन लावून दे]
गाणं सुरू होतं आणि लखेस्वरी बाई खडिया एका वेगळ्या दुनियेत शिरते. नजर हातातल्या माइकवर. तिच्यासाठी हे सगळंच अनोखं होतं. आम्ही तिची जी बोली रेकॉर्ड करायला आलो होतो त्या बोलीतलं तिचं बोलणं किंवा गाणं ऐकण्यात आसपासच्या मोजक्याच लोकांना रस होता. तिचं मन मात्र गाण्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर १६० किलोमीटरवर रायगडमध्ये जाऊन पोचत होतं. लहानपणी हेच शब्द आणि बोली तिच्या आसपास होती.
“आता मी कुणाशी बोलू?” सासू-सासरे गेले. मुलांना सांगते, ‘तुमच्या मायबोलीत बोला. माझ्याकडून शिकून घ्या.’ पण ही पोरं काय ऐकतात का कुणाचं? नातवंडांचं सोडूनच द्या. या अख्ख्या गावात खडिया बोलणारी ही मी एकटी उरलीये आता.” पाटनदादर गावी राहणाऱ्या ५५ वर्षीय लखेस्वरी बाईच्या आवाजाला वेदनेची किनार आहे.
महासमुंद जिल्ह्यातल्या या गावात तिला सगळे ‘जुना’ म्हणतात. बुढुवा खडियाशी लग्न झालं आणि लखेस्वरी इथे नांदायला आली. बुढुवा आता साठीचा आहे. सरकारकडून एक दोन एकर जमीन मिळाली. पण त्यात काहीच भागत नाही. त्यामुळे दोघं जण शेतात मजुरीला जातात. “मी रायगडहून इथे नांदायला आले तेव्हा माझ्या सासू-सासऱ्यांशी खडियात बोलायचे. आता ते दोघंही गेले. या भाषेत बोलायला कुणीच नाही इथे,” ती सांगते. “मला शब्द नीट येत नाहीत, म्हणून मी बोलत नाही,” बुढुवा सांगतो. “इथे सगळा कारभार छत्तीसगढीचा आहे. ही भाषा आता कुणाला कळणार?”




