मनोहर एलावर्ती हे १९ एप्रिल २०२४ रोजी बेंगळुरूच्या सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या देवरा जीवनहल्ली येथे क्विअर लोकांच्या हक्कांबद्दल जागरुकता पसरवणार होते.
संगम नावाच्या लिंग आणि लैंगिक अल्पसंख्याक हक्क गटाचे सह-संस्थापक एलावर्ती यांचा हेतू एलजीबीटीक्यूआयए-प्लस (समलिंगी, उभयलिंगी, इंटरसेक्स, पारलिंगी, अलैंगिक आणि इतरही विविध प्रकारे आपली लैंगिकता व्यक्त करणारे व्यक्ती) समाजाच्या समस्यांसह, वाढता राहणीमानाचा खर्च, बेरोजगारी आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या व्यापक सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करणं, हा होता. त्यांनी चर्चेचं नेतृत्व करण्यासाठी जेंडर अँड सेक्शुअल मायनॉरिटीज फॉर सेक्युलर अँड कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रसी (जीएसएम) या संस्थेच्या सदस्यांसोबत हातमिळवणी केली.
योगायोगाने, भारतात २०२४ च्या लोकसभा निवडणुका सुरू झाल्या त्या दिवशी आणि कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये मतदान होण्याच्या एक आठवडा आधी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली.
एलावर्ती यांनी प्रचार सुरू करताच, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) भगवे दुपट्टे आणि पक्षाची निशाणी घातलेल्या १० पुरुषांनी त्यांना आणि जागरूकता मोहिमेचं वार्तांकन करणाऱ्या मला देवरा जीवनहल्ली अर्थात डीजे हल्लीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये घेरलं. येथील बहुतांश मतदार हे ग्रामीण स्थलांतरित असून अनेक जण मुस्लिम समाजाचे आहेत.
"तुम्ही फक्त काँग्रेस पक्षाचे एजंट आहात!" भाजपचा एक सदस्य खेकसला, मग मनोहर आणि माझ्याभोवती जमलेल्या इतर लोकांनी त्याला दुजोरा दिला. या टप्प्यावर बाकीचे स्वयंसेवक मनोहरला सामील व्हायचे होते. जीएसएमचे पत्रक हातात घेऊन भाजपच्या लोकांनी “हे बेकायदेशीर आहेत” असं जाहीर केलं.











