३१ मार्च २०२४ रोजी कोलकाता येथे ओशज इंडियाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत तज्ज्ञांच्या एका पॅनेलने, सिलिकोसिस केवळ दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने होतो या सामान्य समजुतीच्या विपरीत, अल्पकालीन श्वासोच्छवासामुळे देखील हा आजार होऊ शकतो, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण केलं. उत्तर २४ परगण्यातील सिलिकोसिस रुग्णांमध्ये, जे मोठ्या प्रमाणात रॅमिंग मास उद्योगांमध्ये काम करत होते, हे साफ आढळून येतं. तज्ज्ञांच्या मते, कितीही कालावधीत संपर्कामुळे धुळीच्या कणांभोवती तंतुमय टिशू तयार होऊ शकतात, ज्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
कार पुढे स्पष्ट करतात की, सिलिकोसिस हा एक व्यावसायिक आजार देखील आहे ज्यासाठी कामगारांना भरपाई मिळू शकते. परंतु बहुतेक कामगार नोंदणीकृत नाहीत. ज्या कारखान्यांमध्ये कामगारांना सिलिकोसिसचा त्रास आहे अशा कारखान्यांची ओळख पटवण्याची जबाबदारी सरकारची आहे. पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या मदत आणि पुनर्वसन धोरणात (कलम ११.४) म्हटलंय की कामगार अशा बाबतीत कायदा असो किंवा नसो, मालकांकडून भरपाई मागू शकतात.
पण वास्तव काहीसं वेगळं आहे, कार म्हणतात. “मी अनेक वेळा पाहिलंय की प्रशासन मृत्यू प्रमाणपत्रावर सिलिकोसिसला मृत्यूचे कारण म्हणून नमूद करण्यास नकार देतात,” ते सांगतात. आणि त्याआधीच, कारखाने कामगार आजारी पडल्यावर त्यांना कामावरून काढून टाकतात.
मे २०१७ मध्ये जेव्हा अनिता मंडल यांचे पती सुबर्ण यांचं सिलिकोसिसमुळे निधन झालं तेव्हा कोलकाता येथील नील रतन सरकार रुग्णालयाने जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात "लिव्हर सिरोसिस आणि संसर्गजन्य पेरिटोनिटिस" हे मृत्यूचं कारण म्हणून नमूद केलं होतं. सुबर्ण जामुरिया येथील रॅमिंग मास कारखान्यात काम करत होते.
“माझ्या नवऱ्याला कधीच लिव्हरचा आजार नव्हता,” अनिता म्हणतात, “त्यांना सिलिकोसिस झाला होता.” झुपखली येथील रहिवासी अनिता शेतमजूर म्हणून काम करतात आणि त्यांचा मुलगा स्थलांतरित कामगार आहे, तो बहुतेक करून कोलकाता आणि डायमंड हार्बरमधील बांधकामाच्या ठिकाणी काम करतो. “मला मृत्यू दाखल्यात काय लिहिलंय माहीत नव्हतं. मी त्यावेळी खूप निराश झाली होती. मला कायदे कानून काय कळणार? मी गावाकडली एक साधी घरवाली आहे,” अनिता म्हणतात.
त्यांच्या एकत्रित उत्पन्नातून, अनिता आणि त्यांचा मुलगा त्यांच्या मुलीच्या उच्च शिक्षणाला हातभार लावत आहेत. ती देखील निवडणुकीबद्दल उदासीन आहे. “गेल्या सात वर्षांत दोन निवडणुका झाल्या आहेत. पण मी अजूनही दुःखात जगत आहे. मला सांगा, मला त्यात का रस असेल?” ती विचारते.
#श्वसन-रोग #व्यावसायिक-धोका #निवडणुका-२०२४ #लोकसभा-निवडणुका-२०२४ #स्थलांतरित-कामगार #इंडिया-वोट्स-२०२४
अनुवाद : कौशल काळू