“लोकांना वाटतंय की आम्ही एका परीक्षेसाठी, नोकरीसाठी या मोर्चामध्ये आलोय. पण यामागं हे एकच कारण नाहीये. आमच्या भविष्याचा प्रश्न आम्हाला भेडसावतोय, क्षणोक्षणी त्रास देतोय म्हणून ही गर्दी इथे दिसतेय,” असं छोटू यादव सांगतो.
बिहारच्या सिवान इथून आलेला हा २७ वर्षांचा तरुण. त्यानं सिवान ते दिल्लीपर्यंत दोन दिवस रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून प्रवास केला. छोटू सांगतो, “आमच्या गावांमध्ये, आम्हाला कामासाठी स्थलांतर करावं लागतं नाहीतर कधी न येणाऱ्या संधीची वाट पहावी लागते.”
'चलो संसद' या आंदोलनाची सुरुवात कॉक्रोच जनता पार्टीच्या आवाहनातून झाली. हे आवाहन होतं भारतातील तरुणांच्या समस्या थेट संसदेत मांडण्याचं. संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू झालं आणि या आंदोलनाचा जोर वाढत गेला.
आता हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) पुरतं मर्यादित राहिलं नाहीये. तर त्यानं आता देशाच्या कानाकोपऱ्या पोहोचून देशव्यापी चळवळीचं रूप घेतलंय.
वारंवार होणारी पेपरफुटी, बेरोजगारी, सरकारी भरतीमधील दिरंगाई, शासकीय संस्था, प्रशासनाचा भोंगळ कारभार याविरुद्ध ही व्यापक मोहीम सुरू झाली. बेरोजगारी, गावांमधून वाढलेलं तरुणांचं स्थलांतर आणि तरूण पिढी विशेषतः ग्रामीण भारतातील तरुणांना महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये विचारात घेतलं जात नाही. आपल्याला वगळलं जातंय या भावना आणि निराशा व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन व्यासपीठ बनलं.
“गावात राहणाऱ्या माझ्यासारख्या तरुणांनी खचू नये म्हणून मी दिल्लीला आलोय,” असं वैद्यकीय शिक्षण घेणारा धीरम म्हणतो. तो राजस्थानमधल्या पाली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकतोय. तो आणि त्याचा मित्र आशु राम हे दोघंही सोबत दिल्लीत आलेत. २४ वर्षांचा आशू राम कला शाखेचा विद्यार्थी आहे. जवळपास १५ तासांचा प्रवास करून हे दोघं १९ जुलैच्या दुपारी दिल्लीत उतरले.


























