कृष्णा राणीला एप्रिल महिना हा नेहमीच चांगला महिना वाटत आला आहे. पंजाबमध्ये गव्हाच्या कापणीच्या हंगामानंतर तिने हाताने तयार केलेल्या धान्य निवडण्याच्या टोपल्यांना किंवा सुपल्यांना चांगली मागणी असते. या टोपल्यांना पंजाबीमध्ये ‘छज’ म्हणतात. त्या एका थोड्याशा काळापुरते का होईना त्यांना चांगले पैसे मिळत असल्याने ह्या कारागीरांचा आत्मविश्वास वाढतो आणि आपण स्वावलंबी आहोत याचं मनाला एक समाधानही असतं.
गेल्या सतरा वर्षांपासून कृष्णा राणीसाठी एप्रिल महिना म्हणजे नेहमीच्या कामाचा शिरस्ताच होता. त्यांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू होत असे. फाजिल्का जिल्ह्यातल्या टल्लीवाला बोडला या गावातून त्या सकाळी सहा वाजताची बस पकडायच्या. डोक्यावर छज म्हणजेच सुपल्यांचा गठ्ठा घेऊन त्या संपूर्ण दिवस शेजारच्या गावात आणि इतर ठिकाणी फिरून विकण्यात घालवत असत.
पण अलीकडच्या दिवसांत मात्र त्यांच्या या छजच्या एकमेव गिऱ्हाइक असणाऱ्या म्हाताऱ्या बायका त्यांना हसतच विचारतात, (“बेबे, कित्थे छज्ज चाकी फिरदी ऐ? अजकल दियां कुडियां नूं छज्ज फडन वी नाही आंद्या.”) अगं आता या सुपल्या घेऊन कुठे चाललीयेस? आजकालच्या मुलींना तर ती हातात कशी धरायची असते हे सुद्धा माहीत नाहीये.”
पण कृष्णा राणी त्या बायकांच्या अशा बोलण्याने वा छज घेणाऱ्यांची रोडवणारी संख्या बघून कधीच खचल्या नाहीत. जवळपास चाळीस वर्षांत त्यांच्या मनात कधीही आपला हा कौटुंबिक कलेचा वारसा सोडण्याचा विचार आला नाही. “मी ते काम का सोडू? जेव्हा मला रोटी देणारं दुसरं कामच नाही, तेव्हा हे काम सोडायचं कशासाठी? ह्याच्यावरच तर माझी गुजराण होते,” त्या आमच्या पहिल्याच भेटीत सांगत होत्या. आपल्या झोपडीपुढे शांत बसून ही पन्नाशीतली बाई पुढच्या हंगामाकरिता छज (सुपल्या) विणण्यात मग्न होती.



























