केरळमधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा मल्याळम भाषेची प्रश्नपत्रिका हातात घेतली, तेव्हा त्यात 'तनिच्चिरिक्कुम्पोल' (जेव्हा मी एकटी असते) ही कविता होती. त्या ओळी शांतता, एकाकीपण आणि एकांतवासात मिळणाऱ्या स्पष्टतेविषयी भाष्य करणाऱ्या होत्या. राज्यभरात परीक्षा देणाऱ्या लाखो किशोरवयीन मुलांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती की, ते पी. ए. सेबा या एका तरुण कवयित्रीची कविता वाचत आहेत.
त्याच वर्षी, म्हणजेच २०२३ मध्ये, सेबाचे 'व्हायरल पझुथिल आकाशंगल' हे चिंतनात्मक लेख, कविता आणि चित्रांचं एक पुस्तकसुद्धा प्रकाशित झालं. यातील प्रत्येक ओळ तिच्या 'स्पायनल मस्क्यूलर ॲट्रोफी' (एसएमए) या आजारासोबतच्या संघर्षातून जन्मली होती. हा एक दुर्मिळ जनुकीय आजार असून यात स्नायू कमकुवत होत जातात आणि त्यावर कोणताही खात्रीशीर उपचार नाही. एसएमएच्या रुग्णांचा आपल्या शरीरावरील ताबा हळूहळू सुटत जातो आणि शेवटी श्वास घेण्यासाठीही नळीचा आधार घ्यावा लागतो.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा दूरवरच्या वाचकांना याची कल्पनाही नव्हती की, या कवितेची लेखिका गेली अनेक वर्षं आपल्या खोलीबाहेरसुद्धा पडलेली नाही. श्वासनलिकेत नळी घातलेल्या अवस्थेत, बेडवर झोपूनच तिने या ओळी लिहिल्या होत्या. गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ सेबा 'ट्रॅकिओस्टोमी' नळीच्या सहाय्याने श्वास घेतेय. ती चालू शकत नाही, उठून बसू शकत नाही, इतकंच काय तर अन्नाचा घास गिळण्यासाठीही तिला खूप कष्ट घ्यावे लागतात.
पण २७ वर्षांच्या सेबाने आपल्या मोबाइल फोनचा वापर करून एक सर्जनशील जग उभं केलं आहे. २०१८ मध्ये तिने आपलं लेखन ऑनलाइन पोस्ट करण्यास सुरुवात केली. पण मोबाइलच्या त्या पाच इंची स्क्रीनवर अक्षरं जुळवण्यासाठी तिला आतोनात कष्ट घ्यावे लागतात.
तिरुवनंतपुरममधील पत्रकार पी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर तिचं लेखन पाहिलं. "तिच्या शब्दांत तिखट धार आहे," असं वेणुगोपाल सांगतात. "ती असं लिहिते की जणू शंभर वर्षांचं आयुष्य अनुभवलेला एखादा प्रगल्भ माणूस लिहितोय, पण तरीही त्या शब्दांमध्ये एक कोमलता आहे." आजही जेव्हा सेबा खूप थकलेली असते, तेव्हा वेणुगोपाल तिला टायपिंग आणि संपादनात मदत करतात. "ती मल्याळम आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत तितक्याच ताकदीने लिहिते. जेव्हा तिचे हात थकतात, तेव्हा मी फक्त माझी बोटं तिला उसनी देतो."
२०२३ च्या नववर्षाच्या दिवशी 'टेलिग्राफ'च्या पहिल्या पानावर 'पिंजऱ्यात कैद असले तरीही शब्द मुक्त आहेत' या शीर्षकाखाली आशावादावरचे तिचे टिपण प्रसिद्ध झाले. संपादक आर. राजगोपाल यांनी तिचं फेसबुकवरचं लेखन पाहिलं होतं आणि ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानंतर लवकरच तिच्या मल्याळम साहित्याचे 'व्हायरल पझुथिल आकाशंगल' (बोटांच्या फटीतून दिसणारे आकाश) या नावाने पुस्तक संकलित झाले. जानेवारी २०२३ मध्ये एर्नाकुलम प्रेस क्लबमध्ये केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा झाले. सेबाने आपल्या खोलीत बसून आईच्या मोबाइलवर हा सोहळा पाहिला.
"ती सारखी म्हणत होती, 'बघ गं आई, माझं आकाश आता लोकांपर्यंत पोहोचतंय'," तिची आई साबिरा यांनी 'पारी'ला सांगितले.










