कालिंदी कुंज घाटाच्या दक्षिणेकडे गेल्यावर, नदी पात्र रुंद होत जातं आणि हवेमध्ये रसायनं मिसळतात. पाण्यावर पांढऱ्या फेसाचा थर अधिक जाड होत जातो आणि या वातावरणात श्वास घेतला की घशात जळजळ होते.
४१ वर्षांचे फिरोज मलिक, इथे रोज अनेक प्रकारची कामं करतात. यमुना नदीच्या पाण्यात अस्थिविसर्जनाचं काम ते करतात, हे पाणी दूषित आणि फेसाळलेलं असलं तरीही. “मी पाण्यात उतरलो तर त्यात श्वास घेता येत नाही, जर कुणी इथं अडकला तर तो जगूच शकणार नाही,” ते सांगतात. पण फिरोजला या पाण्यात काम करण्याची आणि त्यातून तरून जाण्याची आता सवय झालीये.
दिल्लीतल्या काही भागांतच यमुना या गुदमरलेल्या अवस्थेत दिसते. अन् तिच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचं जीवनही असंच गुदमरलेल्या स्थितीत आहे. बनारसी आणि फिरोजसारख्या लोकांना या धोकादायक कामातूनच आपलं पोट भरण्यावाचून पर्याय नाहीये.
नदी हा सगळा त्रास शांतपणे सहन करते. अन् तिच्यावर अवलंबून असलेली माणसंही तेच करतात. इथल्या घाटांवर काम करणाऱ्यांना पाण्यात बुडणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरावं लागलं अन् कधीकधी मृतदेह बाहेर काढावे लागतात. अभिनंदन सारखे नावाडी रोज विरोधाभास अनुभवतात. जिथं भाविक नदीची पूजा करतात आणि कचरा इथंच सोडून तिला प्रदूषित करतात. ही यमुनेची लेकरं आहेत, जे नदीचा विनाश अन् सहनशीलता यांचे साक्षीदार आहेत, दुर्लक्षित होणाऱ्या या नदीचे ते खरे संरक्षक आहेत.
अनुवाद : अश्विनी पाटील