मोनाने डोळे मिटून घेतलेत. तिने एका हातात तापलेली सळई धरली आहे, तर दुसऱ्या हातात बांबूची एक पोकळ दांडी. खोलीभर धूर पसरलाय. मोनाचे डोळे अजूनही मिटलेलेच आहेत, ती सळईने बांबूवर एक छिद्र पाडते, मग दुसरं छिद्र पाडते आणि मग तिसरं. अशी एकूण सहा छिद्रं पाडते.
डोळे उघडत ती म्हणते, “बासरी बनवायला कौशल्य लागतं आणि जास्तीत जास्त बासऱ्या बनवायला उरक लागतो.” आणि मग यालाच जोडून ती हसत म्हणते, “पुरुषांना हे जमणार नाही. हे कठीण काम आहे!"
मोना (ती हे नाव वापरणे पसंत करते) ही कारागिरीच्या तिसऱ्या पिढीतली कारागीर आहे. ३५ वर्षीय मोना म्हणते, “बासरी हे एक साधं तरीही किचकट वाद्य आहे. छिद्रांविना ती केवळ बांबूची एक दांडी असते; पण पाडलेल्या अचूक छिद्रांमुळेच तिच्यात सगळ्या सुरावटी सामावतात..ती 'कान्हाजी'चं (श्रीकृष्ण) प्रतीक ठरते.”
गिलावा न केलेल्या खोलीच्या अगदी मधोमध, जळत्या कोळशांनी भरलेल्या मातीच्या चुलीपाशी त्या बसल्या आहेत. या खोलीच्या छताला असलेल्या एकमेव खिडकीतून सूर्यप्रकाशात आत येतोय. बाहेर आकाशात घारी घिरट्या घालत आहेत.













