हा आहे लाटेहरा टोला. इथे रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे दोन डझन घरं आहेत. ही सगळी घरं आदिवासींची! काही पक्की काँक्रीटची; तर काही कच्ची माती नि गवताची! ही आहे सप्टेंबर महिन्यातली दुपार आणि इथे पाऊस नुकता नुकता थांबलाय. तसं आकाश निरभ्र दिसतंय. काही म्हाताऱ्या बायका रस्त्याच्या कडेच्या घरांच्या सावल्यांची शाल अंगावर घेऊन गप्पाटप्पा करत बसल्यात.
सुरकुत्यांचं घनदाट जाळं आणि पाठीला आलेला बाक फुलमणी यांच्या म्हातारपणाविषयी सारं काही बोलून जात असतो. काठी टेकत टेकत त्या माझ्यापाशी येतात. भारत स्वतंत्र झाला तेव्हा फुलमणी जेमतेम तीन वर्षांच्या होत्या. वयाने एकविसावं वर्ष गाठलं तेव्हापासून जामुई जिल्ह्यातल्या लाटेहरा टोल्यात राहणाऱ्या या संथाळ आदिवासी स्त्रीचं नाव मतदारयादीत होतं; अगदी गेल्या महिन्यात वगळलं जाईपर्यंत! सरकारी योजनांचा त्यांना फार मोठा आधार वाटतो. पण ८० पेक्षा जास्त पावसाळे पाहिलेल्या वयस्कर फुलमणी आजीला आता उद्याची चिंता वाटू लागलीय. आपल्याला मतदान नाही करायला मिळालं तर आपण सरकारी योजनांसाठी पात्र ठरणार नाही; मग आपलं कसं होईल, असं राहून राहून त्यांच्या मनात येत रहातं.
विष्णुदेव हंसदा हे दुबारातरी गावातल्या कानार या आदिवासी टोल्यातले. पात्र मतदारांच्या यादीतून त्यांचंही नाव गायब आहे. आणि राजू किस्कू यांचंही! तसंच फुलमणी आजींच्या कुटुंबातल्या पाच सदस्यांचंसुद्धा! ही सगळी नावं उत्क्रमित मध्य विद्यालय, खिरभोजना (पूर्व) इथल्या मतदान केंद्र क्रमांक १४ अंतर्गत येतात. इथली पन्नास नावं वगळण्यात आली होती. त्यापैकी ५० टक्के आदिवासी असल्याचं माझ्या तपासणीत आढळलं. फेरतपासणीनंतरच्या अंतिम यादीत या मतदान केंद्राअंतर्गत ६६१ मतदारांची नावं होती.
जुलै २०२५ मध्ये बिहारमध्ये विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) करण्यात आली आणि त्यात ६६ लाखांहून अधिक मतं वगळण्यात आली. ‘मृत’ आणि ‘स्थलांतरित’ अशी दोन प्रमुख कारणं त्या संदर्भाने नमूद केली गेली. वाचा: बिहार : नोंदणीत मृत, पण प्रत्यक्षात जिवंत!
तसं पाहता, या राज्यात आदिवासींची संख्या इथल्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. अलीकडच्या निवडणुकीआधी झालेल्या एसआयआरमध्ये मात्र त्यांची नावं खूप मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात आली होती. पोटापाण्यासाठी इथले आदिवासी जवळपासच्या डोंगराळ भागात मिळणाऱ्या गौण वनोपजावर अवलंबून आहेत. दिवसभर जंगलात फिरून सरपण गोळा करून ते संध्याकाळी जवळच्या बाजारात विकायला जातात. त्यातून दिवसाकाठी १५०-२०० रुपये त्यांच्या पदरात पडतात. याखेरीज कधी शेतात, कधी मनरेगाच्या कामावर किंवा जिथे कुठे काम मिळेल तिथे हे आदिवासी लोक रोजंदारीवर राबतात.
















