रणाच्या म्हणजेच वाळवंटाच्या वेशीवरचं एक गाव. माझ्यासमोर एक माणूस उभा होता. मिचमिचे डोळे, करडे केस, भेगाळलेल्या, कडक टाचा. उन्हाने होरपळलेली कातडी, ओठांचा आणि गालाचा रंग सारखाच. मिठाच्या कणांनी चमचमणारा काटक देह. त्याला पाहताक्षणी कुणीही ओळखावं. हा अगारिया, मिठागरातला कामगार.
खाराघोढाच्या रणात रेती नाहीच. सगळीकडे फक्त खारी माती. पावसाळ्यात इथे पाणी भरतं. आणि त्यानंतर पुन्हा फक्त माती. कालच्यापेक्षा आज गरम आणि हळूहळू सगळं रण म्हणजे कोरडी माती. क्षितिजावर एकही झाड नाही. कुठे तरी काटेरी झुडुपं दृष्टीला पडतात. नुसतं ऐकूनही दमायला व्हावं. अशा वातावरणात काम करणं म्हणजे विचार करा! कितीही अंतर चाला, तुम्ही कुठे पोचतच नाही. पण आयुष्य तरीही सुरूच असतं.
“हा रस्ता नाही परका
तरि रणात हरवून जातो
पूर्वजांचीच ही वाट
तरि रणात हरवून जातो”
मिठागरात काम करणाऱ्या कामगारांच्या कष्टांना शब्दबद्ध करणारे या रणातले ६५ वर्षीय कवी डी. के. वाणिया म्हणतात, “या प्रांतातले ९९ टक्के अगारिया विमुक्त जमातीतले आहेत – चुंवालिया कोळी.” चुंवालिया हा शब्द चुमवाल या प्रांतावरून पडला. अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाम या उपविभागाचा ईशान्येकडे हा प्रांत येतो. गुजरातीमध्ये चुंवालिस म्हणजे ४४ – चव्वेचाळीस. या भागातली ४४ गावं. या जमातीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे दुःख आणि कष्ट. प्रत्येक घरात संघर्षाची कहाणी आहे. काही तर अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.































