उन्हाळ्याची एक आळसलेली दुपार होती. माझ्या शेजारी खुर्चीवर बसून माझी ऐंशी वर्षांची आजी कुसुम वणकुंद्रे तोरण विणत होती. कॉलेजला सुट्ट्या असल्यानं मी घरीच होतो. बाहेर इतकी गर्मी होती की पाऊल टाकणंही कठीण होते. मुंबईत ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती – जे दशकातील सर्वाधिक तापमान होतं. दुपारच्या जेवणानंतर आलेल्या डुलकीत मी आजीच्या बोलण्यातून तिच्या आठवणींच्या प्रवासात सामील झालो.
माझा जन्म महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील वडगाव या छोट्या गावात झाला. तिथे ३३ कोटी देवांचं जयराम स्वामींचं एक खूप जुने मंदिर होतं. मी ज्या शाळेत शिकले ती या मंदिराच्या भव्य आवारातच भरायची. तिथे खेळायला खूप जागा होती. शाळा सुटल्यावर आम्ही हुतुतू, कबड्डी, लंगडी खेळायचो. नागपंचमीच्या सणाला काही मुली फुगडी खेळायच्या आणि गाणी गायच्या. माझ्या धाकट्या चार बहिणी आणि मी खूप मज्जा करायचो.
शाळा फक्त सातवीपर्यंतच होती. त्यानंतर मी विणकाम आणि शिवणकाम शिकले. मी शेतातही मदत करायचे. माझ्या वडिलांची शेती होती. शेती होती, पण ते मुंबईला कामाला होते. ऑफिसमध्ये काम करायचे, शिपाई म्हणून. आमचं कुटुंब गावात रहायचं. जमीन आमची स्वतःची होती. ती आजही आमच्याकडे आहे. माझा भाऊ ती कसतो. तीन एकर जमीन आहे. त्या दिवसांत आठ जण मिळून त्या जमिनीचे मालक होते, माझे वडील, त्यांचे भाऊ आणि नातेवाईक. तेव्हा ती काही २३-२४ एकर असावी.
या आठ मालकांनी बाजरी, भुईमूग, मूग पेरणीसाठी रोजंदारीवर दोन मराठा मजूर ठेवले होते. आम्ही भुईमूग काढायचो, हरभरे उपटायचो किंवा भाज्या आल्या की त्या गोळा करायचो – वांगी म्हणा, पावट्याच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी. ही सगळी काम करता करता मी कधी २० वर्षांची झाले माझं मलाच समजलं नाही.
लवकरच माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुंबईहून एक स्थळ आलं आणि माझं लग्न ठरलं. १९६५ मध्ये आम्ही सगळे मुंबईला जाण्यासाठी निघालो. मी, माझी आई, वडील, भावंडं, काका, काकू आम्ही सगळे गेलो. वडगावहून रहमतपूरपर्यंत बसने आणि तिथून रात्रीच्या गाडीने मुंबईला.
गावाबाहेर जाण्याचा हा माझा पहिलाच प्रवास होता आणि मुंबईत येण्याचीही पहिलीच वेळ होती. मुंबईची गर्दी पाहून थोडं गडबडल्यासारखं झालं. तिथे पोहोचल्यावर दुसऱ्याच दिवशी माझं लग्न झालं आणि मी अंधेरीला माझ्या सासरी आले. माझे मिस्टर कर्नाटकातले होते. ते एका ऑटोमोबाइल कंपनीत लाइनमन म्हणून काम करायचे. मी दागिने तयार करणं, मंगळसूत्र गुंफण्याचं काम सुरू केलं. अशा प्रकारे आमचा संसार सुरू झाला. दोन मुलं, एक मुलगी आणि आता दोन नाती आणि दोन नातू असा माझा परिवार वाढलाय.
मी आजीला विचारलं, “आणि तू मुंबईबाहेरही गेली आहे ना?”
“कन्याकुमारी, कलकत्ता, जयपूर, काशी, काश्मीर. आणि तुझ्या आजोबांसोबत अगदी सिंगापूर आणि नेपाळला सुद्धा.”
पण आजी, तुझी सर्वात आवडती सहल कोणती होती गं?
“काशीची सहल, जी मी मुंबईत आल्यानंतर ३० वर्षांनी माझी आई आणि बहिणीसोबत केली होती. केवळ महिलांची सहल होती ती. माझी नणंद अशा सहलींना नेहमी जायची. तिने मला त्याबद्दल सांगितलं आणि सोबत येते का म्हणून विचारलं. मी हो म्हटलं.”
“आजोबा काय म्हणाले?”, “तुला भीती नाही वाटली का?” मला अनेक प्रश्न पडले होते. माझी आजी सांगत असलेली गोष्ट आता अचानक खूप रंजक होऊ लागली होती. आयुष्यभर मी तिला फक्त एक साधी, प्रेमळ, दयाळू वृद्ध महिला म्हणून पाहिलं होतं, जी स्वयंपाक करायची, विणकाम करायची, नेहमी हसमुख असायची आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. जिनं आपले संपूर्ण आयुष्य घरात व्यतीत केले होते, खऱ्या अर्थाने ती एक गृहिणी होती. पण आता अचानक मला ३५ वर्षांपूर्वी तिच्या आई आणि बहिणीसोबत तिने केलेल्या एका धाडसी आणि विलक्षण प्रवासाबद्दल समजलं होतं. मला अजून जाणून घ्यायचं होतं.
“काय नाय, जा म्हणून सांगितलं. त्यांची बहीणच ना ती, बहिणीबरोबर जातेस तर जा. ती बायकांची सहल होती, ते येऊ शकत नव्हते. फिरायला जायचंय मग भीती कसली वाटणार.”
मी तेव्हा ५० वर्षांची होते. शालन आजी (तिची बहीण) माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. माझी आई साधारण ७२ वर्षांची असेल. “पहिली लोकं काटक होती ना रे! आता आम्ही कसं काटक नाही आहे एवढं. आमची आई काटक होती. शेवटपर्यंत चालत होती चांगली.” आम्ही ४५ बायका होतो ज्यांनी १५ दिवसांसाठी एक बस बूक केली होती. माझ्या दोन्ही मुलांनी मिळून मला या सहलीच्या खर्चासाठी ४,००० रुपये दिले होते. आम्ही काशी, उज्जैन, मथुरा आणि अशा २७ धार्मिक स्थळांना भेट दिली.
मी डोळे मोठे करून आजीची आणखी एक नवीन गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक होत...


