‘‘संध्याकाळी सगळे प्राणी इथे विश्रांतीसाठी येतात. हे वडाचं झाड आहे.’’
एका पोस्टरच्या आकाराच्या कागदावर मोठ्या कौशल्याने रंगांच्या ओळी रेखत असताना सुरेश धुर्वे बोलत असतात. ‘‘हा पिंपळ आहे. यावर भरपूर पक्षी येऊन बसतील,’’ भल्यामोठ्या झाडाला भरपूर फांद्या काढत ते ‘पारी’ला सांगतात.
मध्य प्रदेशात भोपाळमध्ये राहाणारा ४९ वर्षांचा हा गोंड कलाकार आपल्या घरात फरशीवर बसून काम करत असतो. घराबाहेर असलेल्या झाडाच्या फांद्या आणि पानातून गाळलेला सूर्यप्रकाश दरवाजे आणि खिडक्यांमधून घरात येत असतो. त्यांच्या शेजारी एका छोट्याशा वाडग्यात हिरवा रंग ठेवलेला आहे. सुरेश सतत आपला ब्रश या रंगात बुडवत असतात. ‘‘पूर्वी ब्रश म्हणून आम्ही बांबूच्या काड्या वापरायचो. कधी खारीचे केस. आता मात्र खारीच्या केसांवर बंदी आहे आणि ते योग्यच आहे. आम्ही आता प्लास्टिकचे ब्रश वापरतो,’’ ते म्हणतात.
‘‘माझी चित्रं गोष्टी सांगतात,’’ सुरेश म्हणतात. ‘‘मी चित्रं काढायला घेतो, तेव्हा नेमकं काय आणि कसं काढावं, याचा खूप विचार करतो. समजा, दिवाळी जवळ आली आहे. मग मला दिवाळीला जोडलेल्या ज्या गोष्टी आहेत, उदा. गायी, दिवे, त्या चित्रात दाखवायला हव्यात.’’ गोंड चित्रकार आपल्या चित्रांमध्ये जंगल, आकाश, वेगवेगळे प्राणी, पक्षी, कीटक, लोककथा आणि दंतकथा, शेती अशा अनेक गोष्टी काढतात.






