हे वार्तांकन पार्थ एम. एन. यांच्या पुलित्झर सेंटरचे सहाय्य असलेल्या मालिकेचा एक भाग आहे.
अमोल खांडेकरला त्याच्या चुलत भावाने एका यूट्यूब चॅनलची लिंक पाठवली अन् त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. केवळ एका लिंकमुळे त्याची दोन महिन्याची कमाई एका भोंदू बाबावर खर्च झाली.
अगदी तुटपुंज्या कमाईत गुजारा करणाऱ्या या ३५ वर्षीय कामगारानं युट्यूबवरची एक लिंक पाहिली अन् तो पहाटेच्या बसने प्रवासाला निघाला. त्याच्यासोबत त्याचा अकरा वर्षांचा मुलगा अन् वयस्कर आई होती. त्याच्या मुलाच्या डोळ्याजवळ गाठ असल्याचं काही दिवसांपूर्वी निदान झालं होतं, तर आई सांधेदुखीनं त्रासली होती. राज्य परिवहनाच्या खिळखिळ्या झालेल्या बसमध्ये नऊ तास प्रवास करून तिच्या त्रासात अजून भर पडली होती. पण हा प्रवास व्यर्थ जाणार नाही या आशेनं ती तो सहन करत होती. अमोलच्या चुलत भावानं त्याला सांगितलं की, आरोग्याच्या सर्व तक्रारींची उत्तरं त्या युट्यूब चॅनलमध्ये दडलेली आहेत.
या चॅनलवर अनेक व्हिडिओ होते, ज्यात कपाळावर भस्म फासलेला एका दाढीवाला बाबा हजारो लोकांना संबोधित करत होता. कौटुंबिक समस्या असो वा दारुचं व्यसन, व्यवसायातल्या अडचणी असो वा कॅन्सरसारखे दुर्धर आजार, मानसिक आरोग्याच्या समस्या ते वैयक्तिक जीवनातील निराशा या सगळ्या गोष्टींवर राजेंद्र गडगे महाराजकडे उपाय होता.
त्याच्या चॅनलनुसार, गडगेने दत्त महाराजांचं अध्यात्म अभ्यासलं होतं. या चॅनलच्या परिचय देणाऱ्या भागात लिहिलं होतं की, त्याच्या समर्पित अध्यात्मामुळे दत्तगुरुंनी गडगेला आशीर्वाद दिला. तेव्हापासून तो औषध अन् प्रार्थनेच्या आधारे आपल्या भाविकांच्या समस्या सोडवतो.
दत्तधाम सरकार, संगमनेर असं अधिकृत नाव असलेल्या या युट्यूब चॅनलचे १ लाख ८३ हजार सबस्क्राइबर्स आहेत अन् त्या प्रत्येक व्हिडिओखालची कमेंट वाचून अमोलच्या मनात आशा निर्माण झाली की, ते नक्कीच लोकांच्या समस्या सोडवत असतील.










