कांसी राम गुरुग्रामच्या बंजारा मार्केटमधल्या त्यांच्या दुकानापुढे उभे आहेत. त्याच्या मागे असलेल्या बांबू आणि ताडपत्रीच्या शेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लाकडी फर्निचर विक्रीसाठी ठेवलंय. छोट्याशा जागेत ते बसवलंय. त्यांची पत्नी आशा शेजारीच बसलीये. त्या कापड ओलं करून डोक्यावर ठेवतात. दिवस सुरू झालाय, उन्हाळ्यात दिल्लीतली सकाळही अतिशय कडक असते. त्या म्हणतात, डोक्यावर ठेवलेलं ओलं कापड त्यांचं शरीर गार ठेवतं.
गाडिया लोहारांचं मूळ राजस्थानातलं. तिथं त्यांचा समावेश ‘अति मागास समुदाय’ म्हणून केला गेला आहे. दिल्लीत किंवा दिल्लीच्या आसपास ज्याठिकाणी त्यांची संख्या लक्षणीय आहे, तिथं त्यांचा समावेश इतर मागासवर्गीय (ओबीसी) म्हणून केला जातो. भूमिहीन असलेल्या भटक्या आणि निम भटक्या ९८ टक्के जमातींचाच ते एक मोठा भाग आहेत. भारतातल्या भटक्या समुदायांपैकी केवळ ११ टक्के लोक सार्वजनिक जमिनीवर वास्तव्य करतात. अनेक गाडिया लोहार त्यांच्या बैलगाड्यांमधून प्रवास करतात आणि त्यातच राहतात. या गाड्याच त्यांची फिरती घरं आणि कामाची ठिकाणंही असतात.
कडक उन्हाळ्यांमध्ये आणि कडाक्याच्या थंडीतही हाताने बनवलेली लोखंडी साधनं, भांडी आणि इतर अवजारे विकत कांसी रामनी कित्येक वर्षे रस्त्यावर काढली आहेत.
मात्र, गेल्या दोन दशकांत राजधानी दिल्लीत आणि आसपासच्या परिसरातील वाढत जाणाऱ्या तापमानाचा मोठा फटका बसत आहे आणि त्यामुळे त्यांनी परिसरात फिरणं थांबवलं आहे. ‘पारी’ला सांगताना ते म्हणतात, “इतक्या कडक उन्हात घरोघरी फिरण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून आम्ही तो व्यवसाय सोडला आणि हे काम सुरू केलं.”












