"हमारे चुल्हें तो इन लाशो से जलते हैं," विजय निर्विकारपणे सांगतो. वाराणसीच्या राजा हरिश्चंद्र घाटावर तो आज दुसरी चिता रचतोय. सरणाची राख नि निखारे हवेत तरंगताहेत. धूरानं डोळे चुरचुरताहेत. पेटलेल्या प्रेताचा उग्र दर्प नाकाला झोंबतोय. पण विजय सवयीनं आपलं रोजचं काम करत राहतो.
३५ वर्षीय विजय चौधरी, बनारसमधील डोम समाजाचा. ही अनुसूचित प्रवर्गातील जात. भारतभरातून अंत्यसंस्काराठी वाराणसीत प्रेतं आणली जातात. या प्रेतांच्या विधीवत विल्हेवाटीचा व्यवसाय ही मंडळी करतात. विजयचे वाडवडीलही हेच करत. या कामातील विजयची ही चौथी पिढी.
डोम समुदायाच्या या वस्तीत घराघरात एलपीजी गॅस आहे. पण गेली २५ दिवस गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झालीय. "गॅस संपल्यावर मी नव्या टाकीसाठी नेहमीप्रमाणं फोन लावला. पण कुणी फोन उचलतच नाहीत. एक सिलेंडर हजार रूपयाला मिळायचा, तो आता दोन हजारला झालाय, तो आम्हाला थोडीच परवडणार! मग आमच्या लोकांनी तेच केलं, जे आम्ही जुन्या काळात करायचो – सरणावरची अर्धीमुर्धी जळालेली लाकडं गोळा करून सरपणासाठी आणणं, आता आम्ही तेच करतो, चितेतली लाकडं आणून त्यावरच सैपाक करतोय," विजय 'पारी' प्रतिनिधीला सांगतो.















