“तिला कुणीच हात लावत नव्हतं, सगळ्यांनीच अंतर ठेवलं. काही वेळानं डॉक्टर साहेब आले तर त्यांनीही हातात ग्लव्हज् घातले, चेहचा झाकला आणि मग तिला तपासलं.”
सुनीता लागुरीला हे हॉस्पिटल आता चांगलंच परिचयाच झालंय, तिला आठवतही नाही की तिने कितीवेळा आपल्या मुलीला इथं आणलं असेल.
ही कहाणी आहे तिच्या सात वर्षांच्या मुलीची म्हणजेच रियाची. रिया अवघ्या पाच महिन्यांची असताना तिला थॅलेसेमिया असल्याचं निदान झालं. थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्तविकार असून रियाला ज्या प्रकारचा आजार आहे त्यानुसार तिला जन्मभर रक्त संक्रमण उपचाराच्या आधारे जगावं लागणार आहे. त्यामुळे सुनीताला महिन्यातनं दोनवेळा तिला हॉस्पिटलला न्यावं लागतं अन् यामुळं इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ती ओळखते.
पण सप्टेंबर २०२५ मधला तो दिवस ती कधीच विसरू शकणार नाही.
राज्याच्या स्वामी विवेकानंद निशक्त स्वावलंबन प्रोत्साहन योजनेअंतर्गत दर महिन्याला १००० रुपयांची मिळणार होती. ही मदत आपल्यालाही मिळावी या आशेनं ती त्या दिवशी अर्ज करण्यासाठी घराबाहेर पडली. पण हा अर्ज करताना तिच्या मुलीच्या आणखी काही चाचण्या करण्यास सांगण्यात आलं. पण परिस्थितीनं तिच्यासमोर काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं.
तिनं चाचण्या करवून घेतल्या अन् त्याचा रिपोर्ट येण्याची ती वाट पहात होती. यातल्या एका रिपोर्टनं तिचं आयुष्यच बदलून टाकलं. तिच्या मुलीची चाचणी एचआयव्ही पॉझिटिव्ह आली होती. तिला मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणूची लागण झाली होती. अन् वेळेत उपचार केले नाही तर एचआयव्हीमुळे भयानक एड्स (अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) होण्याचा धोका होता.
“आम्ही या आजाराबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. हा आजार नेमका काय आहे याची माहितीही आम्हाला नव्हती.” घराबाहेरच्या अंगणात बसून सुनीता बोलत होती. तिच्यासोबत तिची मुलगी रियादेखील होती. या घटनेला कैक आठवडे उलटून गेलेत पण ती अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. तिचा नवरा विजय कामानिमित्त अनेक महिने दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जातो. पक्कं घर बांधण्याचं आशेनं तो बाहेरगावी काम करतो. या कुटुंबात पाच लोक असून ते झारखंडच्या अनुसूचित जमात म्हणून वर्गीकृत असलेल्या ‘हो’ समुदायातील आहेत.















