रघुवीर विश्वकर्मांच्या हातातील जाडजुड हातोड्याचा टणत्कार वातावरणात घुमत राहतो : घण घण घण! लोखंडी पत्र्याला सरळसोट आकार येतो. ते काम झालं, की छोट्या हातोडीची मध्धम टाप कानांवर पडते : टप टप टप! आता ते बारीकसारीक बेंड, पत्र्यावरील कण्यांना सपाट करत असतात. त्यांच्या कारागिरीचा हा प्राथमिक टप्पा, यांतूनच पुढे मंजुळ घुंगुरघंट्या आकार घेतील.
"ह्ये गायगुरांचे दागिणेच की!" रघुवीरदादांच्या आवाजात गौरवाचा मृदु भाव जाणवतो, "सोनार माणसांसाठी घडवतो आक्शी तसाच आम्ही गुराढोराचा साज घडवतो"
रघुवीरदादांचं वय – ७६. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील बरांव पाड्यावर राहणारा हा लोहारकलेतील सर्वात बुजुर्ग माणूस. त्यांच्या मते हा पाडा (लोहार वस्ती) जणू एक कारखाना आहे आणि इथं घरोघरी घंटा बनवणारे कारागिर भेटतील.
"हमरा बाप दादा सब यही कर रहा था..." रघुवीरदादा अंगठा दाखवत म्हणतात, "हम तो निपढ आदमी है..." या वाक्यापाठोपाठ त्यांच्या चेहऱ्यावर एक मिस्कील लकेर येते. आपल्यासह, आपले आजेपणजे सगळेच निरक्षर – अंगठेबहाद्दर होते, हे अधोरेखित करताना ते सांगतात, "तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे काम करणारी आमची ही पाचवी पिढी..."
ही शिशिरातली सकाळ आहे. हवेतला गारठा गुंडाळून रघुवीरदादा आपल्या मातीच्या घरासमोर गोणपाटावर उकिडवे बसलेत. भल्या सकाळीच ते कामाला लागलेत. त्यांचा डावा हात मजबूत लोखंडी पत्र्याचे चाप पकडतो नि उजवा आवर्तनांमागून आवर्तनं करत हातोड्याचे घण घालतो. ॠतू कोणता का असेना, या वयांतही या माणसाची मेहनत चुकत नाही.
जनावरांसाठी दागिने म्हणून घुंगुरघंटांचा उपयोग वर्षानुवर्षे होतोय. जगभरच्या ग्रामीण समुदायांनी या साजांचं व्यावहारिक महत्त्व जाणलंय. निबिड जंगलात चरणाऱ्या प्राण्यांचा माग त्यांच्या गळ्यांतील मंजुळ घंटानादामुळंच काढता येतो.
एकेकाळी जनावरांचे हे साजशृंगार खेड्यांतील समृद्धीचं द्योतक होती. पण यांत्रिकिरणाच्या रेट्यात हळुहळू घुंगुरवाळ्यांची मधुर किणकिण मंदावत गेली.



















