४५ वर्षांची सुशीला उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जिल्ह्यात काशी विद्यापीठ ब्लॉकमधल्या अमारा गावात राहते. सुशीलाच्या घरातली पाच माणसं तिच्या छोट्याशा घराच्या अंगणात बसली आहेत. ती कधी आपल्याला मिळालेला पगार दाखवतेय याची ते वाट पाहतायत. दोन घरी घरकाम करुन तिला महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. दुपारी दोन वाजता सुशीला घरी आली.
“दोन घरांतली भांडी आणि केर-लादी यांचे आईला पाच हजार रुपये मिळतात,” विनोद कुमार भारती या तिच्या २४ वर्षांच्या मुलानं सांगितलं. “हे पैसे तिला दर महिन्याच्या एक तारखेला मिळतात. बाबा एका वायरमनच्या हाताखाली काम करतात. ज्या दिवशी काम मिळेल तो भाग्याचा दिवस! हे सोडून आमच्याकडे नियमित उत्पन्नाचं काहीच साधन नाही. मी रोजंदारीवर काम करतो. आम्हाला तिघांना मिळून महिन्याला दहा ते बारा हजार रुपये मिळतात. आता तुम्ही सांगा अर्थसंकल्पातल्या करसवलतीच्या बारा लाखांच्या उत्पन्न मर्यादेशी आम्हाला काय देणंघेणं आहे?”
“काही वर्षांपूर्वी आम्ही मनरेगाचं (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५) काम करत होतो. पण आता ते म्हणतायत की त्यांच्याकडे काही काम नाही.” सुशीलानं आम्हाला तिचं मनरेगा कार्ड दाखवलं. त्यावर २०२१ पर्यंतच्या नोंदी होत्या. त्यानंतर सगळ्याचं डिजिटलायझेशन झालं. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे.





