"जंग यहाँ इतनी बेरहम नहीं लगती, जितनी बाढ" ७३ वर्षीय जसवीर सिंग म्हणतात. भारत-पाकिस्तान सीमेवर काटेरी कुंपणापलीकडं त्यांचं शेत. ते पुराच्या पाण्याखाली गेलंय. आपल्या जमिनीवर पाणलोटाचं साम्राज्य पाहून, हा वृद्ध नुकताच घराकडं परतलाय.
"जहाँ तक नजर जाती हैं, दरिया ने कब्जा कर लिया हैं," सतलज नदीला आलेल्या फुगवट्याबद्दल जसवीर सांगताहेत. 'पारी' प्रतिनिधीनं सप्टेंबर, २०२५ च्या अखेरीस त्यांच्याशी बातचित केली.
वाले शाह हिथार हे सीमावर्ती गाव. इथली ४० एकर शेतजमीन आंतरराष्ट्रीय सीमेनं घेरलीय. १९९० च्या सुमारास या जमिनींभोवती कुंपण घातलं गेलं. काँक्रीटचे खांब रोवून सीमा चिन्हांकित केली गेली. एरवी शेतकरी आपल्या जमिनीची वेस राखायला कुंपण घालतात. इथं ते काम दोन राष्ट्रांनी केलंय. या कुंपणाआतली जमीन कसायला यांना बेधडक जाता येत नाही. बीएसएफची परवानगी लागते. जसवीरच्या कुटुंबाची १९ एकर जमीन ही अशी. आंतरराष्ट्रीय कुंपणातली. १९८० साली त्यांनी ही जमीन खरेदी केली. त्याकाळी गावशिवारातील अन्य जमिनींच्या तुलनेत, ही सीमावर्ती जमीन स्वस्तात मिळाली. थेह कलेंदर हे जसवीरचं गाव, गावातून मोटारसायकलनं निघाले, तर अर्ध्या तासात ते शेतावर पोचतात.
ऑगस्ट २०२५. पंजाबमध्ये पूरानं थैमान घातलं. या पूरात जसवीर सिंगची १५ एकर शेतजमीन बुडाली. भाताचं पिक काढणीला आलेलं. ते क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जानेवारी, २०२६ मध्ये 'पारी'शी बोलताना ते म्हणाले, "जमिनीत अजूनही चिखलच आहे. त्यामुळं मी खरिपात गहू पेरला नाही. सात-आठ एकर जमीन पाण्याखाली गेलीय. तिथं पेरणी शक्यच नाहीय. अजून सहा महिने, किंवा वर्षभर तरी तिथलं पाणी जिरणार नाही." पूरानंतर सलग दोन हंगाम वाया गेलेत. जसवीर सिंग हात चोळत, पाणी मुरायची वाट पहात बसलेत.
पंजाबमधील पूरात ४० माणसं दगावलीत. ७, १६१ पशू वाहून गेले नि १४००० हून अधिक घरांची पडझड झालीय. सुमारे दोन लाख हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय. "भाताचं पीक कापणीसाठी तयार होतं, नेमकं त्याचवेळी पूरानं सगळं चकनाचूर करून टाकलं." चाळीशीतले अशोक सिंग सांगतात. ते जसवीरप्रमाणेच फाजिल्का जिल्ह्यातील वाले शाह हिथार गावचे शेतकरी.
"तेव्हापासून माझी झोप उडालीय. जरा कुठं डोळा लागतो न लागतो, दचकून जाग येते, न् मग सारी रात्र काळजीत या कुशीवरून त्या कुशीवर जागरणात जाते." अशोक सिंग 'पारी'ला सांगतात. सीमावर्ती भागात त्यांचं १० एकर शेत. त्यांनी भात पेरलेला. पण सगळं पीक नष्ट झालं. अशोक सिंगचं १० लोकांचं कुटुंब या शेतीच्या भरवशावरच गुजराण करतं.
















