मी के. मुकेश, वेल्लोर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट मॉडेल स्कूलमध्ये अकराव्या इयत्तेत शिकतोय. तिथे मी 'फोटोग्राफी' हा विषय आवडीने निवडला आहे. कॅमेरा कसा हाताळायचा आणि त्यातून काय टिपायचं, हे मी तिथे शिकलो. दगडखाणीत ड्रिलर म्हणून काम करणारे माझे ५१ वर्षांचे वडील कथिरवेलू के. यांच्यासारख्या कष्टकरी लोकांचा संघर्ष मी माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतो.
वडील कामासाठी बाहेर असताना माझी आई वसंती के. घर सांभाळते. ती माझी आणि माझी १२ वर्षांची बहीण दर्शिका दोघांचीही काळजी घेते. १५ दिवसांतून एकदा वडील जेव्हा एक-दोन दिवसांसाठी घरी येतात, तेव्हाच आमची अन् त्यांची भेट होते. घरी आल्यावर बऱ्याचदा तेखूप थकलेले आणि निरुत्साही दिसतात. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची मला मिळणारी ती एकमेव संधी असते.
ते घरी असतात तेव्हा मी त्यांना त्यांच्या कामाबद्दल खूप प्रश्न विचारतो आणि तेही शांतपणे उत्तरं देतात. पण तरीही त्यांच्या कामाचं स्वरूप मला कधीच नीट उमजलं नव्हतं. अखेर एक दिवस आमचे फोटोग्राफी शिक्षक श्रीपथी यांच्या मार्गदर्शनानंतर मी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायचं ठरवलं. सोबतीला माझा कॅमेरा होताच.
मी जे पाहिलं ते लिहून काढलं – माझ्या वडिलांच्या आयुष्याची ही गोष्ट, जी थोड्या शब्दांत आणि अनेक फोटोंमध्ये मांडली आहे.























