“मी शोले पिच्चरमधल्या ठाकूरसारखा आहे.”
रवींद्र शिंदे मिश्किल टिप्पणी करत शोलेमधल्या संजीव कुमार यांचं पात्र आणि त्यांचं आयुष्य कसं सारखं आहे हे सांगतात. पुढे अगदी क्षणात ते बोलतात, “पण मी बहुधा त्याच्यापेक्षा जास्त नशीबवान आहे. मला एकच हात नाहीये त्याला मात्र दोन्ही हात गमवावे लागते होते.”
असं आयुष्य असताना स्वतःच्या आयुष्यावर हसणं किंवा विनोद करणं तर दूरच, त्यांच्या जागी इतर कुणीही व्यक्ती असली तर ती जगण्याची जिद्दच हरवून बसेल. पण ४७ वर्षीय शिंदेंची तिरकस आणि उपरोधिक विनोदबुद्धी अजूनही शाबूत आहे.
शिंदेंची यवतमाळमधल्या उमरी गावात १६ एकर जमीन. कळत्या वयापासून ते निष्ठेनं शेती करतात. पण दुर्दैवाने, त्यांनी शेती सुरू केली त्या काळापासून शेतकरी संकटांनीही आपले पाय रोवायला सुरुवात केली होती.
त्यांचे वडील शेतीच्या उत्पन्नातून घर चालवायचे, परंतु रवींद्र याचं लग्न झालं आणि मुलं झाली, तोपर्यंत शेतीचं चित्र पूर्णपणे चित्र बदललं होतं. वाढती महागाई, शेतमालाचे घसरलेले भाव अन् प्रचंड दुष्काळ यासारखे हवामान बदलाचे तीव्र परिणाम यामुळं शेतीवरील कर्जाचा डोंगर वाढत गेला.
महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाचं सरासरी मासिक उत्पन्न अवघं ११,४९२ रुपये इतके आहे. हे संकट नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीतून स्पष्टपणे आपल्याला कळतं. २०२४ मध्ये भारतात १०,५४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली. म्हणजेच दररोज २९ आत्महत्या. ही आकडेवारी देखील प्रत्यक्षात खूप कमी दाखवली गेली आहे, कारण प्रत्यक्षात माहिती गोळा करताना अनेकदा महिला, दलित आणि आदिवासींना वगळलं जातं. कागदपत्रांवर, त्यापैकी बहुतेकांच्या नावावर ते शेती कसत असलेली जमीनच नसते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्यांचा समावेश अनेकदा ‘शेतकरी’ आत्महत्यांमध्ये केलाच जात नाही.
या यादीत महाराष्ट्र ३,८२४ आत्महत्यांसह अव्वल स्थानी होता, जे देशभरातील एकूण संख्येच्या ३६ टक्के आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भात होतात. शिंदेंचं गाव याच विदर्भात येतं अन् ते सध्या कृषी संकटाच्या आव्हानांशी झुंज देतायत.
पण आपलं आयुष्य याहूनही अधिक कठीण होणार आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.














