मशिदीशेजारच्या आपल्या खोलीभर घराच्या शेवाळलेल्या भिंतीवर एक इटकुलं पोपटी पान उगवलं तेव्हा अमीनाच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते उपटून टाकण्याचं तिचं मन होईना. अलिकडे ती घराबाहेर पडत नाही फारशी. दिवसेंदिवस आपल्या खोलीत असते एकटीच. काही तरी भयानक घडलं होतं ज्यात ती पुरती मोडून पडली. पोटातला गर्भही पडून गेला होता. त्या भयानकाच्या सावटाखाली जगत असताना कुठे जावं असं कुणी नव्हतंच. त्या काळात ही पिटकुली, हिरवीचुटुक हृदयाच्या आकाराची पालवीच कोवळीक होती तिच्यासाठी.
आणि ती पालवी किब्लाच्या दिशेनेच वाढत होती. उगाच वाटलं का तसं? का काही तरी मोठा संकेत होता तो? अमीनाला ठरवता येईना.
महिनाभरातच भिंतीला पडलेली भेग मोठी व्हायला लागली. पसरली. देठ मोठं होत चांगलं फूटभर लांब झालं. आणि आणखी काही नाजूक पानं आली. अमीनाला काही वावगं वाटत नव्हतं. मन जरा थाऱ्यावर आलं होतं आता. दंगली थांबल्या होत्या. रस्ते आपापल्या लयीत गजबजू लागले होते. घरूनच भरतकाम करून अमीना चार पैसे कमावू लागली होती. घरी काम करत असताना अमीना स्वतःशीच बोलत असायची. जणू काही तिचं कुणी तरी काही तरी ऐकत असावं. तिच्या मनातली घालमेल आणि आघात समजून घेत असावं, तसं.
आपल्याच घराच्या भिंतीची बाहेरची बाजू त्या लोकांच्या रस्त्यावर आहे आणि त्या भिंतीत एक भलामोठा पिंपळ उगवलाय याची तिला माहितीच नव्हती. त्या लोकांशी आजकाल फारसं काही बोलणंच होत नाही. खरं तर काहीच बोलणं होत नाही. त्याच भिंतीच्या बाहेर कुणी तरी चार दगड आणून ठेवलेत हेही तिला माहीत नव्हतं. मग काही चमत्कार घडले आणि लोकांनी त्या झाडाच्या भोवती पार बांधावा का याबद्दल मतं आणि पैसे गोळा करण्यात आले. असं सगळं घडत होतं. जणू काही तिच्या नजरेआड तो पिंपळ काहीतरी कट रचत असावा. हा दैवी वृक्ष उपटून टाकण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्याच्या भोवती किती तरी कथा तयार झाल्या होत्या. हाच वृक्ष इथे याच ठिकाणी कसा उगवला, त्याच्या मुळांमध्ये विष्णूचा वास असतो. विष्णूच ना? का ब्रह्मदेव? नोटीस वाचता वाचता ती आपल्या अज्ञानावर मनात बोटं मोडत होती.


