मी तिला पहिल्यांदा कुठे पाहिलं? मी वाचलेल्या एखाद्या पुस्तकात, टीव्हीवर पाहिलेल्या माहितीपटात, की अन्यायाविरुद्ध मूठ आवळून लढा देणाऱ्या एखाद्या रस्त्यावर? कदाचित ती एखादी कविता होती किंवा अंगावर शहारे आणणारी स्वातंत्र्याची घोषणा.
मला खरंच आठवत नाही मी तिला शेवटचं कधी पाहिलं होतं.
तिने आपली रूपं आणि नावं इतक्या वेळा बदलली आहेत की माझ्या आठवणींत तिचा मागोवा घेणंही अवघड झालं आहे. कधी ती दिंडीगुलमधील शिवणकाम करणारी बाई असते, जी कामाच्या ठिकाणची शांतता मोडत विखुरलेल्या घटकांना एकत्र जोडून एक संघटना उभी करते. तर कधी एका रॅलीत आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी, हुबळी ते बेंगळुरू भाड्याचा ट्रॅक्टर चालवत नेणारी शेतमजूर असते. ती दक्षिण केरळमधील एक जुनी मैत्रीण असते, जी घरोघरी जाऊन थोड्याफार प्रमाणात मिळणारी मदत गोळा करते, जेणेकरून आसपासचा कोणीही उपाशी राहू नये. ती रूपं बदलणारी आहे; ती त्याच जिद्दी, धैर्याने आणि हार न मानण्याच्या त्याच वृत्तीनं वेगवेगळ्या रूपांमध्ये परत येते.
हे बघा! ती मला परत दिसतेय. आता ती बॅरिकेडवरून उडी मारणारी एक तरुणी आहे. तर कधी पडलेल्यांना सावरणारी साथी आहे. ती कधीही हार न मानणाऱ्या आशेसारखी आहे.
ही नेहमी तिची भूमी राहिलीये. आजाद.


