रुबिना बीबी आपल्या झोपडीच्या बाहेर एका जुन्या दरवाजाची लाकडी फळी फोडताना बोलतेय, “आमच्यापैकी कोणीही आता गोळा केलेलं लाकूड, लाकडाचे तुकडे विकत नाही, प्रत्येक जण ते स्वतःची चूल पेटवण्यासाठी जपून ठेवतोय.”
आपल्या पाच जणांच्या कुटुंबाचा स्वयंपाक करण्यासाठी, अशा दोन फळ्या लागत असल्याचं रुबिना सांगते. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धापासून एलपीजीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आता दोन किलोच्या छोट्या सिलेंडरसाठी ४४० ते ५०० रुपये मोजावे लागतात. ज्या युद्धापूर्वी असलेल्या गॅसच्या किमतीपेक्षा दुप्पट आहेत.
कचरा वेचणाऱ्या या कुटुंबाकरिता आता स्वयंपाकासाठी लागणारे लाकडाचे तुकडे अत्यंत महत्त्वाचे बनलेत. एका आठवड्यात ते कसेबसे पाच किलो लाकूड गोळा करू शकतात किंवा “आम्ही पाच रुपये किलो दराने लाकूड विकत घेतो,” रुबिना सांगते.
त्या वायव्य दिल्लीतल्या भलस्वा इथं कचरा वेचणाऱ्यांच्या वस्तीत राहतात, तिथं राहणारे बहुतांश मजूर पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील स्थलांतरित आहेत. अनेक लोक इथं एक-दोन पिढ्यांपासून राहतात. तीन ते चार मजली उंच असलेल्या कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्याशेजारीच या लोकांची वस्ती आहे. इथं राहणारे पुरुष रस्त्यातून, निवासी भागातून आणि महानगरपालिकेच्या कचरा कुंडीतून कचरा गोळा करतात. तर महिला प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, रबर, काच, थर्माकोल आणि इतर वस्तू वेगळ्या करतात अन् जमा केलेल्या सर्व वस्तू नंतर त्या भंगार विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना विकतात.














