आंदोलनाच्या महिनाभराच्या कालावधीत पोलिसांनी तीन वेळा हे वाचनालय बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण या विरोधाला न जुमानता ते पुन्हा पुन्हा उभं राहिलं.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ या मीम पेजचं रुपांतर एका युवा चळवळीत झालं आणि तरुणांनी २० जून २०२६ रोजी दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलनाची हाक दिली. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटणे आणि त्यातील अनियमितता यांतून समोर आलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. याच कालावधीत ‘ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’ने या जागी एक ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट होता.
एआयएसएफचा राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग म्हणाला, “पुढचे काही दिवस आंदोलकांसाठी जंतर मंतर हे घरच बनणार होतं. या काळात तुम्ही दिवसभर घोषणा देता आणि भाषणे ऐकता. पण तुमच्याकडे स्वतःसाठीही खूप वेळ असतो. अशा परिस्थितीत पुस्तकं ही उत्तम सोबती ठरतात. आंदोलक आणि विद्यार्थ्यांनी साहित्य वाचावं, त्यांची सामाजिक व राजकीय जाणीव अधिक समृद्ध व्हावी, अशी आमची कल्पना होती.”
या वाचनालयासाठी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी एक लाकडी टेबल आणला आणि त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरला, त्यावर लिहिलं होतं : ‘प्रधान नापास झालेच पाहिजेत.’ वाचनालयाची धुरा सांभाळणाऱ्या २० वर्षीय मोहितनं सांगितलं, “पहिल्या दिवशी आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके होती. क्रांतिकारी साहित्याशिवाय आंदोलन म्हणजे विचारसरणी नसलेल्या नेत्यासारखं असतं. साहित्य आंदोलकांना प्रतिकार आणि बंड कसं करायचं, याचं मार्गदर्शन करतं.”









