अशोक जाटव एक चालती फिरती मृत व्यक्ती आहे.
४५ वर्षीय अशोक दररोज सकाळी इतर पुरुषांप्रमाणेच उठतात. इतर मजुरांप्रमाणेच ते लोकांच्या शेतात कामाला जातात. इतर कामगारांप्रमाणेच ते दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी घरी परत येतात. त्यांच्यात आणि इतरांमध्ये फक्त एकच फरक आहे: कागदोपत्री, अशोक मरण पावले आहेत.
जुलै, २०२३ मध्ये खोरघर येथील राहणाऱ्या अशोक यांना लक्षात आलं की आपल्याला प्रधान मंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत सलग दोन वर्षं रू. ६,००० मिळाले नाहीत. २०१९ मध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकरी दरवर्षी रू. ६,००० पर्यंत किमान उत्पन्न भत्ता मिळण्यास पात्र आहेत.
पहिले दोन वर्षं पैसे नियमितपणे जमा व्हायचे. मग ते अचानक थांबले. त्यांना वाटलं की काहीतरी गडबड झाली असेल, आणि प्रणाली स्वतःहून दुरुस्त होईल. अशोक यांचं म्हणणं बरोबर होतं. गडबड तर झाली होती, पण त्यांनी कल्पना केली नव्हती, अशा प्रकारची.
अनुदान का थांबलं हे जाणून घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, तेव्हा कंप्युटरच्या मागे बसलेल्या माणसाने डेटा पाहिला आणि त्यांना शांतपणे कळवलं की २०२१ मध्ये कोविड-१९ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यावर हसावं की रडावं अशी गत झालेले अशोक म्हणाले, “ मुझे समझ नहीं आया इसपे क्या बोलू [यावर काय बोलणार मला कळत नव्हतं].”







