आपली कहाणी सांगायला कादर अली आता या जगात नाही.
आमची अखेरची भेट नोव्हेंबर, २०२५ मधील. तेव्हाही कादरशी मला बोलता आलं नव्हतं. कारण तेव्हा कादर त्यांच्या पत्र्याच्या खोलीत अंथरुणाला खिळलेले. त्या खोलीत त्यांचं खोकणं तेव्हढं घुमत होतं. त्यांच्या अंगणात एक कोंबडा कोंबड्यांमागे धावत होता. सैरावैरा पळणाऱ्या त्या कोंबड्यांचं केकाटणंही कादरना कर्कश वाटत असावं. लाकडी बाजेवर विसावलेलं कादरचं हडकुळं शरीर हतबल वाटत होतं.
पण ही गत येण्यापुर्वीची अवस्था अशी नव्हती. नोव्हेंबरपुर्वीच्या भेटीत कादर थकलेले दिसले. पण त्यांची आशा मावळली नव्हती. ते आधार घेतल्याबिगर चालत होते. गतायुष्यातील किस्से खोल गेलेल्या आवाजात का होईना, सांगत होते. पण नोव्हेंबरमध्ये अर्धांगवायूनं त्यांचा कब्जाच घेतला. शरीर लुळं पडलं. साधे हातवारेही मुश्कील झाले. पण कादरची शुद्ध हरपली नव्हती. अजूनही त्यांना आपण मायभूमीचा पूत आहोत हे सिद्ध करायचं होतं. त्यासाठी लावली, तशीच बाजी ते जीवनाची डोर सुटू नये यासाठी लावत होते. अखेर ती निकराची झुंज शमली.
"पंधराएक दिवस झाले, ते तापानं फणफणले. अंगातलं रक्तही जणू आटलंय." कादरचा ३३ वर्षीय मुलगा शाहिदुल इस्लाम सांगत होता. तो आसाममधील गमारिगुरी गावातील त्याच्या घराच्या व्हरांड्यात पाय रोवून उभा होता. उभ्या उभ्याच तो कादरच्या अंतिमघडीची कहाणी सांगत होता, "खाणंपिणं सोडलंय त्यांनी, बोलतही नाहीत, हालचालही जवळपास थांबल्यातच जमा. कुणास ठाऊक अजून किती दिवसांचे मेहमान आहेत ते..."
कादर अजूनही भानावर होते. शरीर मलूल असलं, तरी डोळे ताणून ते कसलीशी आशा शोधत होते. खोलीच्या दारातून येणारा उजेड नि छताच्या छिद्रातून पडणारं कवडसं, सूर्य मावळताच विरून जातं, तशी ती आशाही हळूहळू मिटत गेली.
ही आमची अखेरची भेट. काही दिवसांतच कादर वारले. वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी. तो दिवस होता – १८ नोव्हेंबर २०२५.











