त्याचं नाव ‘टाइमपास’. “कहेर बरपा था,” कोविड महामारीचा भयंकर काळ आठवताना तो म्हणतो, “बहुत लाश जलाया था, गिनती के बाहर हो गया था.”
पाटणा. गंगेच्या काठावरील बांस घाट. हे या भागातील पुरातन स्मशान. पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ नं उच्छाद मांडलेला, तेव्हा या घाटावर एक पोरसवदा मुलगा एकामागून एक अंत्यसंस्कार उरकत होता. अविरत पेटलेल्या चितांच्या अग्नींमुळं हा प्रकाशझोतात होता. आता मात्र, शहरांतून वावरताना तो नजरेसमोरून गेला तरी कुणाचंच लक्ष वेधत नाही. बेरोजगारांच्या गर्दीत हरवलेला 'टाइमपास' आता केवळ एक विस्थापित आहे.
रोजगार ना कमाई, केवळ निरुद्देश इकडं-तिकडं भटकणं, अशानं या तरुणाचं जीवन आता त्याच्या नावागतच झालंय - ‘टाइमपास’
त्याच्या या अनोख्या नावाची हकीगत रंजक आहे. त्याचा काका जुगनू राम एकदा सिनेमा पाहून आलेला. नेमकं तेव्हाच हे पोर जन्माला आलेलं. काकाचं रिकामटेकडं भटकणं, सिनेमाला जाणं वगैरे 'टाइमपास' करण्यावरून घरातील महिलांनी चेष्टा केली. झालं, जुगनू रामनं घरात जन्माला आलेल्या पोराचं नाव त्या चेष्टेवरूनच ठेवलं ते टाइमपास.
नाव काही का असेना, माणसाला पोटासाठी राबावंच लागतं. “मी मिळेल ते काम करतो,” टाइमपास सांगतो. “मी कधी मेट्रो ट्रेनमधली संडासं साफ करतो, कधी गटारांतली घाण काढतो, कधी कुठं मरून पडलेलं डुक्कर उचलून टाकतो, तर कधी बेवारस प्रेताचा अंत्यसस्कार करतो. काहीच काम मिळालं नाही तर कचऱ्यातून भंगारही वेचून विकतो.” बेरोजगार टाइमपासनं अशी एक ना अनेक कामं शोधलीत.
शहरात कुठंही-कधीही बेवारस प्रेत आढळलं की, त्या वास मारणाऱ्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी टाइमपास सारख्यांची मदत घेतली जाते. रेल्वेच्या रूळांवर चेंदामेंदा झालेली बॉडी असो की पाण्यात फुगलेला मृतदेह, किंवा शहरांत कुठंतरी फुटपाथवर मरून पडलेला बेवारस इसम, टाइमपासला पाचारण केलं जातं. अनेकदा पोलिसांच्या जीपमध्ये बसवून त्याला सरकारी दवाखान्याच्या डेड हाऊस जवळ सोडलं जातं. शवविच्छेदनाच्या कामांतही त्याची मदत होते.
या कामांमध्ये तो तरबेज आहे, किंवा त्यानं मृतदेहांना हाताळण्याचं खास प्रशिक्षण घेतलंय असं काही नाही. केवळ तो ‘डोम’ जातीचा आहे, म्हणून त्याच्यासारख्यांना ही कामं सांगितली जातात. ‘डोम’ हा बिहारमधील अतिवंचित सामाजिक तबका. ही जात महादलित श्रेणीत मोडते. २०२३ च्या ताज्या जातीनिहाय सर्वेक्षणानुसार, या समुदायाची लोकसंख्या २,६३,५१२ इतकी आहे; राज्याच्या १३.१ कोटी लोकसंख्येत ते केवळ ०.२० टक्के आहेत.
हिंदू समाजव्यवस्थेच्या उतरंडीत डोम ही अगदी तळवर्गातली जात. प्रबळ जातवर्गांनी रूढीपरंपरेनं यांची कामं नेमलीत. मग ते मृतदेहांची विल्हेवाट लावणं असो की गटारांची सफाई अशा हिनकस रोजगारांतच हा समाज गुंतून पडलाय.

















