"अर्थसंकल्प हा फक्त मध्यमवर्गीयांसाठी आहे. आमच्या अस्तित्वाच्या कुठल्याच समस्यांचे निराकरण या अर्थसंकल्पातून होत नाही." गीथा वाळाचल सांगतात.
३६ वर्षीय गीथा वाळाचल या कदर आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. हा समाज शासनाच्या 'अत्यंत असुरक्षित आदिवासी घटक' प्रवर्गात मोडतो. गीथाचे घर केरळच्या त्रिचूर जिल्ह्यात प्रस्तावित अथिरापल्ली जलविद्युत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातच येते. हे धरण चलाकुडी नदीच्या प्रवाह क्षेत्रात येते आणि यामुळे कदर समाज या प्रकल्पामुळे चौथ्यांदा विस्थापित होणार आहे.
"देशात सगळीकडे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहतायेत आणि यामुळे खूप आदिवासी समुदाय विस्थापित होत आहे. शिवाय मोठ्या कंपन्यांकडून जंगल, जमीन, व नैसर्गिक संसाधने बळकावली जात आहे." गीथा या प्रकल्पाविरोधाचा चेहरा बनल्या आहेत.
“आदिवासींसाठी जागतिक हवामान बदल सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, दिवसेंदिवस कमी होणारी जंगले, आणि त्यामुळे उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव या गोष्टींशी आम्हाला झगडावे लागत आहे.” गीता सांगतात, ज्या केरळमधील एकमेव महिला आदिवासी प्रमुख आहेत.




