पुन्हा पुन्हा प्राणांतिक उपोषणं, १६५ दिवस चाललेली निदर्शनं, मोर्चे, रस्ता रोको, आमदारांना दिलेली निवेदनं, प्रतिकात्मक शवयात्रांचा प्रयोग, प्रत्यक्ष घाणीत उतरून केलेला आत्मपिडा सत्याग्रह. एकामागून एक आंदोलनांची मालिकाच...
राज्य शासनानं आपल्या मागण्यांची दखल घ्यावी, यासाठी चेन्नईतील महापालिका कर्मचाऱ्यांनी अथक नि तीव्र लढा दिला. हे केवळ कुठलंतरी एक आंदोलन नव्हतं; तर ते होतं शहरांतील अत्यंत शोषित-पीडित कष्टकऱ्यांनी पुकारलेला एक ऐतिहासिक लढा. या संघर्षाचे नायक होते ते — ज्यांनी काळाच्या वरवंट्याखाली निमूट रगडून चक्काचूर व्हायला ठाम नकार दिला.
कामगार आंदोलन करत, नि शासन-प्रशासन कानाडोळा. ही चालढकल कितीतरी काळ चाललेली. डिसेंबर २०२५ मध्ये एम. महालक्ष्मीनं प्रशासनाच्या या वर्तनाचं नेमकं वर्णन केलेलं. ३७ वर्षीय महालक्ष्मी बरीच वर्षे सफाईकामगार आहेत, त्यांच्या मते प्रशासन 'जातीवाद' करतं. त्या म्हणालेल्या "आम्ही १३० दिवसांपासून आंदोलनं करतोय, पण आमचं साधं ऐकून घ्यायला कुणी तयार नाही. मंदिरातील कामगारांनी तर आंदोलनही केलं नाही, तरी सरकारनं त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या. नर्सेस आठवडाभर आंदोलन करतात न लगेच त्यांच्या मागण्या मान्य होतात. आम्ही काय वेगळं मागतोय? त्यांच्यासारखाच सन्मान दलित सफाई कामगार मागू लागला की, प्रशासन मूग गिळून गप बसतं."
शासन-प्रशासनानं कामगारांकडं साफ दुर्लक्ष केलं, पण सुदैवानं विविध समाजघटकांची सहानुभूती कामगारांनी कमावली. उळैपोर उरिमाई अय्यकम (युयुआय), लेफ्ट ट्रेड युनियन सेंटर (एलटियुसी) नि ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (एआयसीसीटियु) यांसारख्या संघटना कामगारांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. तसंच नागरी संस्था व विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा पाठिंबाही मिळू लागला. कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. के भारती व कॉ. कुमारस्वामी यांनी सफाई कामगारांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व स्वीकारलं. २८ नोव्हेंबर, २०२५ रोजी ॲड. पुलियांथोपे मोहन व कुट्ट अय्यकम यांच्या नेतृत्त्वात आंदोलन झालं. या आंदोलनामुळंही सफाई कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला.





















