‘कजलिया’ सणाची तयारी नऊ दिवस आधीपासून सुरू होते. बुंदेलखंड आणि बघेलखंड प्रदेशातील लोक एका मातीच्या भांड्यात गहू टाकतात आणि नऊ दिवस त्याची पुरेपूर काळजी घेतात. ते अंकुरले की त्याची पूजा केली जाते. ‘खुजलू’ म्हणून ओळखले जाणारे हे गव्हांकुर टोपल्यांमध्ये ठेवले जाते आणि महिला पारंपरिक लोकगीते गाऊन त्या टोपल्या डोक्यावर ठेवून मंदिरात जातात.
शाहडोल जिल्ह्यातील पाचगाव येथील मंदिरात जाताना ढोलकी वादन करणारी आणि लोकगीत गाणारी ममता सांगते, “आम्ही कजलिया सण खूप आनंदाने साजरा करतो.”
हा सण मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात खास मानला जातो. स्थानिक लोक याच्याकडे सगळ्यांना एकत्र आणणारा सण म्हणूनही पाहतात, उत्सव म्हणूनही बघतात. हा क्षमा करण्याचा आणि पुढे जाण्याचा काळ असतो. लोकांचा असा विश्वास आहे की, एखाद्याला ‘खुजलु’ दिले तर तो ते लगेच स्वीकारतो आणि सुसंवाद पुन्हा सुरू होतो. ब्राह्मण आणि राजपूत यांसारखे उच्च मानलेल्या जातीचे लोक त्यांच्या घरी ध्वज मिरवणूक आणि पूजा विधी आयोजित करतात. आदिवासी गोंड आणि बैगा समुदाय लोकगीते आणि नृत्यांसह उत्सव साजरा करतात.
“इथे जत्रेसारखं वातावरण असायचं,” मंदिराची देखभाल करणारे रामस्वरूप विश्वकर्मा सांगतात. “पूर्वी सणामध्ये सहभागी होण्यासाठी दूरवरून लोकं जमायची. भजन-कीर्तनाच्या आवाजाने वातावरण भरलेलं असायचं आणि संपूर्ण गाव आनंदाने चैतन्यमय व्हायचं.”


