दलित कबड्डी संघाचा विजय हा जातीय हिंसाचार भडकवण्यासाठी पुरेसा ठरला. देवेंद्रराज परीक्षेला निघालेला असताना हल्लेखोरांनी बस थांबवली, त्याला बाहेर खेचलं आणि रस्त्यावरच धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. जेव्हा त्याचे वडील मला हे सांगत होते, तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: काटा आला. हा हिंसाचार एका खेळाबद्दल, त्यातल्या हार-जितीबद्दल नव्हता. तो होता- सत्ता आणि वर्चस्वाबद्दल! कबड्डीमध्ये एक दलित विद्यार्थी तथाकथित उच्च जातीच्या मुलांना मात कशी काय देऊ शकतो, हा विचार या क्रूर घटनेच्या मुळाशी होता. आणि गंमत म्हणजे, या घटनेत पीडित ठरलेला देवेंद्रराज ओळखला जात होता तो त्याच्या भागातल्या सर्वोत्तम कबड्डीपटूंपैकी एक म्हणून!
डॉक्टरांनी मला सांगितलं- त्याच्या डोक्यावर आणि हातांवर खोल जखमा होत्या. एक जखम तर गंभीर स्वरूपाची होती. त्याची बोटं अंशतः तुटली होती आणि ती बरी व्हायला दोन ते तीन महिने लागणार होते. “प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वी बोटं व्यवस्थित जुळून येणं आवश्यक!’’ असंही डॉक्टर म्हणाले.
“मी वीटभट्टीवर जातो कामाला. मला दोन मुलं. देवेंद्रराज त्यातला थोरला. तो पलयमकोट्टईतल्या शाळेत शिकतोय. धाकटी मुलगी. मी आणि बायको दोघंही दररोज विटा पाडायच्या कामाला जातो,’’ थंगा गणेश सांगत होते.
त्यानंतर त्यांनी स्वत:ची गोष्ट सांगायला सुरुवात केली, स्वत:च्या आयुष्याची गोष्ट! “मी लहान असताना मला जातीबद्दल अजिबातच काही जाणीव नव्हती. आमच्या शिक्षकांपैकी कुणीही कधीच आंबेडकर किंवा पेरियार यांच्याबद्दल आम्हाला काही सांगितलं नाही. दहावीचा निकाल लागला तेव्हा घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती. म्हणून मग मी ‘मोटर मेकॅनिक्स’च्या अभ्यासक्रमासाठी आयटीआय [व्यावसायिक तंत्र प्रशिक्षण संस्था] मध्ये अर्ज केला. त्यासाठीचं प्रवेश शुल्क होतं ६५० रुपये. पण तितकेही आमच्यापाशी नव्हते. मग माझ्या आईला उसनवारी करावी लागली.’’
मनात स्वप्नं, हातात पैसे नि शिकण्याची दृढ इच्छा! तिथे पोहोचल्या पोहोचल्याच तिथल्या अधिकाऱ्यांनी आमच्यापैकी दोन-तीन जणांची नावं पुकारली आणि सांगितलं- ‘आता जागा शिल्लक नाही.’ त्यांनी आम्हाला अक्षरश: बाहेर ढकललं आणि फाटक बंद करून घेतलं. त्यातच मी एक होतो. असं का केलं जातंय, मला काहीच कळलं नाही. त्या बंद फाटकासमोरच मी ढसाढसा रडलो. त्यांनी सांगितलं- ‘तुझे गुण कमी आहेत.’ मी विचारलं- ‘मग मला प्रवेशपत्रच का दिलं?’ पुढे वर्षानुवर्षं छळत राहिला मला हा प्रश्न!