डोक्यावर टोपल्या घेऊन चालणाऱ्या स्त्रिया, कुऱ्हाडी हातात धरलेले पुरुष, बैलगाड्या हाकणारे शेतकरी, आणि गौर मारिया नृत्याच्या तालावर नाचणारी तरुण मुलं-मुली — गढबेंगळ या नारायणपूरच्या घनदाट उष्णकटिबंधीय जंगलातील गावात असलेल्या या जुन्या मातीच्या, बांबूच्या कुंपणाने वेढलेल्या घराच्या अंगणात जणू गोंड आदिवासींचं संबंध जगच उतरलंय. आजूबाजूला अर्धवट कोरलेले, नव्याने कापलेले लाकडाचे तुकडे विखुरलेले आहेत. लाकडाचा उबदार, मातीचा, हिरवळीसारखा सुगंध हवेत भरलेला आहे. प्रत्येक तुकडा जणू एक गोष्ट सांगायची वाट पाहतो आहे — जसं आपली साधनं, लाकूड आणि शिकणारी तरुण पिढी यांच्यात बसलेले हे ज्येष्ठ पांडी राम.
गुडघ्यावर बसून, लाकडाच्या एका छोट्या कोरलेल्या तुकड्यावर वाकून, मोतिबिंदू झालेल्या कमकुवत डोळ्यांनी चष्म्यामागून बारकाईने पाहत, हा सत्तर वर्षांचा कलाकार आपल्या कलाकृतीला शेवटचा हात देतो आहे. ते अधूनमधून आपल्या खास साधनांना त्यांच्या स्थानिक नावांनी हाक मारतात — छेन्नी, त्रिकोण, रेगी, पटाशी, हातोडी. आपल्या हातांच्या प्रत्येक हालचालीतून आणि गोंडी मातृभाषेतून कधी सल्ला तर कधी इशारा करत ते आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. पांडी राम यांनी लाकडावर कोरलेली प्रत्येक ओळ जंगलाच्या श्वासाशी लय साधून आहे आणि त्या जंगलाशी सुसंगतपणे जगलेलं जीवन त्यांच्या मुरिया गोंड समुदायातल्या एका पिढीला स्पष्टपणे आठवतं.
आजकाल त्यांना काम करणं कठीण झालं आहे. पण त्याहूनही जास्त कठीण आहे ते त्यापासून दूर राहणं. “ते फक्त एखादाच तुकडा हातात घेतात आणि त्यांना तत्क्षणी कळतं — काय योग्य आहे, कुठे अजून काम करणं आवश्यक आहे,” असं कलाकार असलेला त्यांचा मुलगा बलदेव सांगतो. “ही कला माझ्या श्वासाइतकीच महत्त्वाची आहे,” पांडी राम म्हणतात. “जर मी तिला सोडलं, तर कदाचित मीही जास्त काळ जगणार नाही.” ते ओसरीत बसले आहेत, आजूबाजूला चार-पाच जण लाकूड घासण्यात, मूर्ती कोरण्यात किंवा लाकडाचे तुकडे हलवण्यात गुंतलेले आहेत.
“आधी मला वाटायचं ही फक्त गावातली आणि गावापुरतीच अशी गोष्ट आहे,” पांडी राम सांगतात. “पण शहरातल्या लोकांनी तिची कदर करायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की यावर आपल्याला आपला उदरनिर्वाह चालवता येईल. मग माझ्या वडिलांकडून मिळालेलं कौशल्य हळूहळू घडवत, मी याच कलेला माझं आयुष्य बनवलं.” त्यांची पस्तीस (३५) वर्षांची साधना आपल्या समाजाचा समृद्ध वारसा आणि लाकडात कोरीव काम करण्याची प्राचीन कला जिवंत ठेवण्यासाठीच वाहिलेली आहे. घरगुती वापरासाठी असो वा सजावटीसाठी — लाकूड आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू या समाजाच्या घरात, निरनिराळ्या विधींमध्ये, सण-समारंभात आणि रोजच्या आयुष्यात अगदी सहजपणाने सामावून गेल्या आहेत; त्या वस्तू काही तेंव्हा केवळ उपजीविकेचा मार्ग नव्हत्या.


























