“अरे, तो शेवटचा बर्गर होता आणि त्याने आताच नेला. मला खूप वाईट वाटतंय, मॅडम,” राहुल मला सांगत होता; मी त्याला जंतर-मंतर आंदोलन स्थळाबाहेर भेटले तेव्हा तो बाइकवर बसला होता आणि त्याच्या पाठीवर लाल रंगाची ‘झोमॅटो’ डिलिव्हरी बॅग होती. संध्याकाळचे सहा वाजले होते आणि बर्गरची ती बॅग रिकामी झाली होती. “बंगळुरूच्या एका माणसानं पाठवलेल्या या ऑर्डरमध्ये बर्गरची ३० पाकिटं होती,” त्यानं सांगितलं.
बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातला राहुल कुमार यादव विद्यार्थी असून तो दिवसा कॉलेज करतो. आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्याने कॉलेज बुडवलं नाही; त्याऐवजी, त्यानं संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत डिलिव्हरी बॉय म्हणून नाईट शिफ्टमध्ये काम करून आंदोलनात वेगळ्या पद्धतीनं योगदान दिलं. त्याने पोचवलेल्या काही ऑर्डर्स इतर शहरांमधील लोकांनी पाठवलेल्या होत्या. हे पार्सल अज्ञात देणगीदारांनी पाठवले होते आणि ते कोणा ठराविक व्यक्तीसाठी नव्हते. तर ते होते जंतर-मंतरवर उपस्थित असलेल्या आणि भुकेल्या असणाऱ्या कुणासाठीही.
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान, लाठीचार्ज आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अटकेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, अनेक ठिकाणांहून अन्न येत होतं. बर्गर, सँडविच, पार्ले-जी बिस्किटांची पाकिटं आणि इतर उपयोगी वस्तू या विविध ऑनलाइन ॲप्सच्या सर्व्हिस डिलिव्हरी पार्टनर्सकडून म्हणजेच 'गिग वर्कर्स'कडून पोचवल्या जात होत्या. तसंच, दिल्लीतील घराघरांतूनही शिजवलेले अन्न येत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे, जवळच असलेल्या गुरुद्वार्याच्या लंगरमधूनही या तरुणांसाठी जेवण येत होतं; हा लंगर अनेक दशकांपासून लोकांसाठी सुरू आहे.








