सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याची बबलू कैबर्ताची ही दुसरी वेळ आहे.
गेल्या निवडणुकीत बबलू पहिल्यांदा मतदान करण्यासाठी गेला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला आत जाऊ दिलं. त्याला कोणत्याही रांगेत थांबावं लागलं नाही. पण पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातल्या पालमा गावात मतदान केंद्रात गेल्यावर मतदान कसं होईल याची काही बबलूला खात्री नव्हती.
२४ वर्षांचा बबलू दृष्टी विकलांग आहे आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्र असलेल्या स्थानिक प्राथमिक शाळेत संख्या जास्त होत असल्याने तिथं ब्रेल मतपत्रिका किंवा ब्रेल इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) साठी कोणतीही तरतूद नव्हती.
“काय करावं हे मला कळत नव्हतं. मला मदत करणाऱ्या व्यक्तीने चिन्हांबद्दल खोटी माहिती दिली तर?” द्वितीय वर्षाचा पदवीधर असलेल्या बबलूने प्रश्न केला. जरी त्या व्यक्तीने खरं सांगितलं तरीही तो सांगतो की, गुप्त मतदानाच्या त्याच्या लोकशाही अधिकाराचंही इथे उल्लंघन केलं जाईल. जरा घाबरलेल्या अवस्थेत बबलूने त्याला दाखवलेलं बटण दाबलं आणि बाहेर आल्यावर पडताळून पाहिलं. “सुदैवानं, ती व्यक्ती माझ्याशी खोटं बोलली नव्हती,” तो म्हणतो.
भारतीय निवडणूक आयोग अपंग व्यक्तींसाठी अनुकूल बूथसह ब्रेल मतपत्रिका आणि इव्हीएमचा वापर करण्यास सांगते. कोलकाता स्थित श्रुती अपंग हक्क केंद्राच्या संचालिका शम्पा सेनगुप्ता म्हणतात, “कागदावर अनेक तरतुदी आहेत, परंतु अंमलबजावणी योग्य होत नाही.”
सार्वत्रिक निवडणुका पुन्हा तोंडावर आल्या आहेत, पण सार्वत्रिक निवडणुका, २०२४ च्या सहाव्या टप्प्यात मतदान करण्यासाठी आता घरी जावे की नाही याची बबलूला खात्री नाही. बबलूची पुरुलियामध्ये मतदार म्हणून नोंदणी झाली असून २५ मे रोजी मतदान होणार आहे.





