२०१७ मध्ये माझ्या फोटो प्रदर्शनातून माझा PARI साठीचा प्रवास सुरू झाला. पण जर वानविल रेवती आणि चित्रकार नटराजन यांची साथ लाभली नसती तर मला दृश्यकलाकार म्हणून ओळख मिळवून देणारे हे प्रदर्शन झालंच नसतं. २००४ च्या त्सुनामीनंतर रेवती यांनी नरिक्कुरवर आणि बूम बूम मट्टुकारार समाजातील मुलांसाठी वानविल शाळा सुरू केली. त्यांच्यामुळेच मी तरविक्कड आणि ओन्नंकड वस्तीतील मुलांना आणि लोकांना भेटलो आणि त्यांचं जीवन जवळून जाणून घेतल्यावर मला त्यावर लिहावं आणि त्यांचं आयुष्य कॅमेऱ्यात टिपावं असं मनापासून वाटलं.
बूम बूम मट्टुकारार हे अनुसूचित जमातीचे लोक आहेत, ज्यांना आदियन म्हणूनही ओळखलं जातं. “बूम बूम” हे नाव त्यांच्या उरुमी या आडव्या उखळाच्या आकाराच्या ढोलाच्या आवाजावरून पडलं आहे. या नावाचं मूळ त्यांच्या पारंपरिक व्यवसायात आहे. सजवलेल्या नंदी बैलाला घेऊन गावोगावी भविष्य सांगत भटकणं हा या लोकांचा एक परंपरागत व्यवसाय आहे.






























