कधीकधी पक्ष्यांच्या आवाजाव्यतिरिक्त, फक्त एकच आवाज ऐकू येत असतो, तो म्हणजे भरलेल्या भातशेतीतून हिरवी रोपे लावणाऱ्या महिलांच्या चालण्याचा आवाज. आणि तेव्हाच पाहिल्यावर पाच महिला उत्स्फूर्तपणे बिहू गाणं गात असल्याचं आपल्याला दिसतं.
आसामी दिनदर्शिकेनुसार जुलै महिना म्हणजे ‘आहार’ महिना – भाताच्या रोपांची पुनर्लागवड सुरू होण्याचा दिवस, जो ‘नोभुई’ म्हणून ओळखला जातो. हिरा सैकियाच्या साळगुरी या गावी असलेल्या शेतामध्ये उन्हाळा अजूनही कडक आहे, हवा ओलसर आहे आणि काम तर शरीराला थकवणारं आहे. ५२ वर्षीय हिरा सैकियाच्या चार मैत्रिणी लागवडीच्या हंगामाच्या पहिल्या दिवशी तिला मदत करण्यासाठी आल्या आहेत. ५० वर्षीय गुणिता सैकिया ही गावातील आशा सेविका आहे. दुसरी ५५ वर्षीय अरुणा बोरा ही स्वयंपाकी आहे, जी शाळेतील मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवते. तिसरी आहे एकेकाळी पंचायत सदस्या असलेली ३५ वर्षीय ब्रिस्टीपर्णा सोनोवाल आणि ३५ वर्षीय नोमी सैकिया जी एक शेतकरी आणि गृहिणी आहे. या सर्व महिला त्यांच्या स्वतःच्या जमिनीच्या छोट्या तुकड्यावर सुद्धा भाताची लागवड करतात व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. एखाद्या दिवशी हिरा त्यापैकी एकीच्या मदतीला जाते.






